मदतीच्या बहाण्याने मारला ९९ हजारांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:41 AM2019-07-29T02:41:13+5:302019-07-29T02:41:57+5:30

दहिसरमधील घटना : दुकलीने एटीएममध्ये पैसे न भरता केले लंपास

Helped excuse stolen 99 thousand in mumbai | मदतीच्या बहाण्याने मारला ९९ हजारांवर डल्ला

मदतीच्या बहाण्याने मारला ९९ हजारांवर डल्ला

Next

मुंबई : एटीएम मशिनमधून खात्यात पैसे जमा करताना, मदतीच्या बहाण्याने एका दुकलीने ९९ हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार दहिसर येथे उघडकीस आला आहे. नथुराम दत्ताराम जाधव (४३) यांनी दहिसर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पालघरचे रहिवासी असलेले जाधव डायमंड कारखान्यात नोकरीला आहेत. १२ जुलै रोजी कामानिमित्त ते दहिसरमध्ये आले होते. तेथील बँकेत ते एक लाख रुपये जमा करण्यासाठी गेले असता, त्या शाखेत खाते नसल्याने एटीएम मशिनद्वारे पैसे भरण्याचा सल्ला बँक कर्मचाऱ्यांनी दिला.

त्यानुसार, ते एटीएम सेंटरमध्ये गेले. तेथे १ लाख खात्यात जमा केले असता, पाचशेच्या दोन नोटा परत आल्या. मात्र, ९९ हजार जमा झाल्याची पावती मिळाली नाही. गर्दी असल्याने त्यांनी बाजूच्या एटीएम सेंटरमध्ये बँक स्टेटमेंट काढली. मात्र, त्यातही ९९ हजार रुपयांची नोंद दिसून आली नाही. त्यांनी एटीएम सेंटरच्या बँकेत जाऊन घडलेला प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला, तेव्हा १५ जुलै रोजी त्यांना येण्यास सांगितले. चौकशीत पैसे मशिनमध्ये नसल्याचे समजले. त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला आणि एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यात पैसे जमा करतेवेळी त्यांच्यामागे असलेली व्यक्ती आणि त्याच्या साथीदाराने त्यांना बोलण्यात गुंतवून पावती काढण्याच्या बहाण्याने ९९ हजार रुपये परस्पर काढले. तेथून ते पसार झाल्याचे दिसून आले. दोघेही २० ते २५ वयोगटांतील आहेत. त्यानुसार, शुक्रवारी त्यांनी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Helped excuse stolen 99 thousand in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.