Join us

कोकणातील पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:07 AM

मुंबई : कोकणावर कोसळलेल्या अस्मानी संकटात कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या परिस्थितीत येथील नागरिकांना आणि समाजबांधवांना त्यांच्या पायावर ...

मुंबई : कोकणावर कोसळलेल्या अस्मानी संकटात कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या परिस्थितीत येथील नागरिकांना आणि समाजबांधवांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी हातभार लावण्याच्या उद्दिष्टाने कोकणस्थ (सं) वैश्य समाजाने महाड, चिपळूण आणि खेड येथे प्रत्यक्ष भेट देत पूरग्रस्त कुटुंब, व्यापारी ज्ञातीबांधव यांना मदत केली.

कोकणस्थ वैश्य समाजाच्या पुढाकाराने मुंबईतील इतर ज्ञाती संस्था, मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघ, वैश्य सहकारी बँक, एम. व्ही. टी. व्ही. पतपेढी, वैश्य विद्यावर्धक, माऊली मित्रमंडळ, महाराष्ट्र जनता सहकारी पतपेढी आणि या संस्थांशी संलग्न बांधवांच्या सहकार्याने ‘कोकण पूरग्रस्त वैश्य ज्ञातीबांधव कर्तव्यनिधी’ उभारण्यात आला. हा निधी या संस्थांच्या प्रतिनिधी मंडळांनी पूरग्रस्त भागांना भेट देत वितरीत केला. शालेय साहित्य, घरगुती वस्तू आणि दोन हजार रुपये रोख रकमेच्या स्वरूपातील ही मदत ५०० कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आली. महाड, चिपळूण आणि खेड येथे छोटेखानी कार्यक्रमांमध्ये ही मदत गरजूंना देण्यात आली. समाजाचे भाई शेट्ये, जागृती गांगण, प्रदीप गांगण, मेघना थरवळ, मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाचे नंदकुमार हेगिष्टे, प्रकाश साडविलकर, माऊली मित्रमंडळाचे परशुराम वायकूळ, गोपीनाथ नारकर, संजय गांगण, संजय कोळवणकर, नितीन कोलगे आदी पदाधिकारी कोकणात गेले होते.

कोकणस्थ (सं) वैश्य समाज ही १३४ वर्षे जुनी सामाजिक संस्था असून, ज्ञाती बांधवांबरोबरच समाजातील विविध घटकांच्या उन्नती आणि मदतीसाठी अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय मदत, निराधार महिलांसाठी दरमहा आर्थिक सहाय्य, मुलांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदत हे स्थायी उपक्रम राबविले जातात. नैसर्गिक आपत्ती, २६/११चे बॉम्बस्फोट, कोविड-१९ साथरोग अशा विविध संकटांच्यावेळी संस्था कर्तव्यबुद्धीने सामाजिक कार्यात सहभागी झाली होती, अशी माहिती संस्थेच्यावतीने देण्यात आली.