पूरग्रस्तांना मदतीचा हात, राष्ट्रवादीचे सर्व खासदार-आमदार एक महिन्याचा पगार देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:51 PM2019-08-08T16:51:43+5:302019-08-08T16:56:49+5:30
महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई - राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूरग्रस्तांसाठीराष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार-आमदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ९ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेल्फेअर संघातर्फे पहिला ट्रक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार आहे. त्यामध्ये औषधे, कपडे, बिस्कीटे असणार आहेत. इस्लामपूरमध्ये जवळपास ७२ हजार नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहितीही मलिक यांनी दिली.
महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. या पुराचा फटका राज्यातील जवळपास अडीच कोटी नागरिकांना बसला आहे. त्यामध्ये, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पूरस्थितीबाबत बेजबाबदार असून आपल्या महाजनादेश यात्रेत मस्त आहेत, अशी टीकाही मलिक यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन दिवसांपूर्वी पूर स्थितीचा प्रश्न निर्माण केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी तातडीची कॅबिनेट बैठक घेतली. मात्र, या बैठकीमध्ये भूखंड वाटपाचा निर्णय घेतला जातो. पोलीस ठाणे कुठे उभारायची याचा निर्णय घेतला जातो. त्यांनी मुंबईत येऊन आपतकालीन यंत्रणेच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घ्यायला हवी होती. मात्र, ती न घेता मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात की, मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. मुख्यमंत्री हे या प्रकरणी किती बेजबाबदार आहेत यावरुन लक्षात येते, असेही मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना सत्तेचा माज आला असून राजकीय झेंडे बाजूला ठेवून, विरोधकांना सोबत घ्या आणि राज्यातील नागरिकांना कशाप्रकारे मदत करता येईल याकडे लक्ष द्या, असा सल्लाही मलिक यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व खासदार-आमदार आपला एक महिन्याचा पगार राज्यातील पूरग्रस्तांना देणार..
— NCP (@NCPspeaks) August 8, 2019
मुंबईतील पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ते @nawabmalikncp यांची घोषणा..