गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: कांदिवली आणि बोरिवली परिसरात जवळपास दोन हजार लोकांना घरपोच रेशन पुरविण्यात आले आहे. या लोकांमध्ये मध्यमवर्गातील लोकांचा समावेश अधीक असून 'सोशल डिस्टन्सिंग' चे काटेकोरपणे पालन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम भूमी डेव्हलपर्सचे भागीदार तसेच समाजसेवक लालसिंग राजपुरोहित यांनी राबवला. त्यांच्या या उपक्रमामुळे मध्यमवर्गाला बराच दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू असल्याने सरकारकडून मदत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ही मदत विशेषतः झोपडपट्टीतील लोकांना मिळत असून उच्च वर्ग सध्या तरी अशी मदत घेण्याची गरज भासलेली नाही. मात्र या सगळ्यात मध्यमवर्गीय लोकांना कोणतीच मदत पोहोचत नाही. तसेच धान्यासाठी एखाद्याच्या दरवाज्यात रांग लावण्यास हा वर्ग सहसा धजावत नाही. हिच बाब ओळखत राजपुरोहित यांनी गेल्या पंधरा दिवसात तांदूळ, डाळ, मीठ, साखर आणि तेल समावेश असलेल्या पिशव्या कांदिवली तसेच बोरिवली परिसरात राहणाऱ्या लोकांना पिशव्या पुरविल्या आहेत. राजपुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश चव्हाण, राज वर्मा, दिलीप कनोजिया, दिपक यादव, अरविंद जयस्वाल,राहुल जयस्वाल, रामकिशन चौहान तसेच प्रवीण यादव हे तरुण दिवसरात्र धान्य पिशवीत भरून घरपोच करण्यासाठी राबत आहेत. झोपडपट्टीतील लोकांनाही याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे लोकांकडून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.
-----------------------------
'मदत द्या,कोरोना नको' !'कोरोनाला रोखण्यासाठी 'सोशल डिस्टन्सिंग' पाळणे आवश्यक असल्याचे वारंवार आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे मदतीचा हात पुढे करताना लोकांना कोरोनाची लागण होऊ न देणे ही देखील माझी जबाबदारी असल्याचे मी मानतो. त्यामुळे आम्ही आधी सर्वांच्या नावाची यादी तयार केली आणि त्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन रेशन दिले. त्यामुळे गर्दी टाळण्यात आम्हाला यश मिळाले असुन माझे हे कार्य मी अविरत सुरू ठेवले आहे.
- लालसिंग राजपुरोहित - बिल्डर, भूमी डेव्हलपर्स