लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - गोरेगावातील स्वरगंध कला मंच संस्थेतर्फे नुकतेच नेस्को कोविड सेंटरला दीड लाखांचे २५ ऑक्सिजन मीटर त्यांच्या मागणीनुसार देण्यात आले. त्यामुळे येथील एचडीयू विभागात २५ बेड्स वाढणार आहेत.
नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रादे यांच्याकडे संस्थेचे संस्थापक शशांक कामत यांनी सदर उपकरणे नुकतीच सुपूर्द केली. यावेळी समता महाजन, स्नेहा वासकर, शैलेंद्र पाटील उपस्थित होते.
गोरेगावातील समाजसेवक शशांक कामत यांनी २०१६ साली या संस्थेची स्थापना केली. गोरेगावातील नावाजलेली सामाजिक संस्था म्हणून स्वरगंध कला मंच संस्थेकडे पाहिले जाते. संगीत, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील नामवंतांचा गोरेगावकरांच्या उपस्थितीत गौरव या संस्थेतर्फे करण्यात येतो.
सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विषय उपक्रमात संस्था काम करते. दरवर्षी २५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पर्यावरण संवर्धनासाठी गोरेगावात वृक्ष लागवड, कचरा निर्मूलन आदी सामाजिक उपक्रम राबवते.
कोरोना महामारीच्या काळात अकराशेहून अधिक विद्यार्थ्यांना मदत, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णांना मदत करत असतानाच आता नेस्कोमध्ये ही मदत देऊन संस्थेने आपली सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती शशांक कामत यांनी दिली.
...................................