मुंबई : कोरोनाकाळात अनेकांचे हाल झाले असून, आता कुठे हद्दपार होणारा कोरोना पुन्हा लोकांचे हाल करू लागला आहे. या दीड वर्षाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अडचणी वाढल्या आहेत. विशेषत: हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत असून, वंचित, निराधार आणि बेघरांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांना दिलासा देण्यासाठी ‘टच’ नावाची संस्था सरसावली असून, मदतीत त्यांनीदेखील खारीचा वाटा उचलला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून ‘टच’ ही संस्था कार्यरत असून, रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर, वंचित, निराधार यांना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. वंचित आणि बेघर मुलांना शिक्षण आणि निवारा देत त्यांना समाजामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम केले जात आहे. वंचित आणि दुर्लक्षित घटकांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी काम केले जाते. कोरोनामुळे दीड वर्षापासून ज्यांना रोजगार नाही अशा कुटुंबांना मदत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्यावर्षी एक हजार ८२ कुटुंबांना पाच हजार ४०० किलो तांदूळ, दोन हजार २५० किलो डाळ आणि मीठ पुरविण्याचे काम केले जाहे. हायजिन किट आणि मास्कचे वाटपदेखील केले आहे. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांना अन्नधान्यवाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कोणी गरीब भुकेला राहणार नाही
कोरोनात लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गोरगरिबांसाठी चाइल्ड राहत फाउंडेशनचे विश्वस्त दत्तात्रय औटी यांनी पुढाकार घेतला आहे. कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगरमध्ये गरीब, गरजू मुलांसाठी धान्यवाटप करण्यात येत आहे. कोणी गरीब भुकेला राहू नये यासाठी औटी प्रयत्नशील असतात. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक गोरगरिबांना फाउंडेशनमार्फत धान्यवाटप केले गेले आहे. लहान मुलांना वैद्यकीय मदतही करण्यात येत आहे. औटी यांच्या मार्गदर्शनाखाली केतन भोसले, नरेश कुंदन आणि सचिन चौधरी काम करत आहेत.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मोफत
कोविडकाळात टच एक नवीन उपक्रम राबवत आहे. कोविड काळामध्ये ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी असेल आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल, अशा रुग्णांसाठी टच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत उपलब्ध करून देत आहे. तरी गरजूंना आवाहन केले आहे की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज असल्यास संपर्क साधावा.