सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबईदीड वर्षापासून जबरदस्तीने सुरू असलेल्या लैंगिक शोषणातून एका २०वर्षीय बांगलादेशी मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली आहे. तिच्या धाडसामुळे इतर २४ मुलींचीही सक्तीच्या वेश्याव्यवसायातून सुटका झाली आहे. बांगलादेश येथून नोकरीच्या बहाण्याने आणलेल्या या मुलींकडून धमकावून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. ज्या मुलीमुळे हा प्रकार उघडकीस आला तिला दीड वर्षापासून साधी दमडीही मिळाली नव्हती.नोकरीच्या शोधात असलेल्या बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीच्या तक्रारीनुसार, जुहूगाव येथे केलेल्या कारवाईत त्याचा उलगडा झाला. मूळचा बांगलादेशचा अन्वर एका २०वर्षीय तरुणीला मुंबईत मॉलमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून घेऊन आला होता. या वेळी तिच्यासोबत बांगलादेशच्या इतरही चार मुली होत्या. त्यांना कोलकाता येथे आणण्यात आले. तिथे त्यांची भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली गेली. रेल्वेने त्यांना मुंबईत आणण्यात आले. जानेवारी २०१४मध्ये तिने नवी मुंबईत जुहूगाव येथे पहिले पाऊल ठेवले. जुईनगर येथील ज्या घरात तिला आणण्यात आले, तिथे अगोदरच काही मुली राहत होत्या. तिथे एका खोलीत नेऊन अन्वरने तिचे विवस्त्र फोटो काढले. तिच्यावर बलात्कारदेखील करण्यात आला. कुटुंबाला दरमहा पैसे पाठवायचे असतील तर हेच करावे लागेल, असेही सांगण्यात आले.जेमतेम पाचवी शिकलेली ही तरुणी मिळेल त्या संधीचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. देहविक्रीच्या मोबदल्यात इतर मुलींना महिना १० ते १५ हजार रुपये दिले जायचे. परंतु या मुलीला मात्र दमडीही मिळत नव्हती. मुंबईला येऊनही ती घरी पैसे पाठवत नसल्याने तिची आई सतत संपर्कात असल्याचे समजताच तिच्याकडचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आला. अखेर एक महिन्यापूर्वी रात्री सर्व जण झोपलेले असताना तिने कैदेतून पळ काढला. ती वाशीतच फिरत होती. मिळेल त्या ठिकाणी झोपायची. तिच्यावर स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या एका महिलेची नजर पडताच त्यांनी गुन्हे शाखेला याची माहिती दिली. मुलीने पोलिसांना माहिती देताच छापा टाकण्यात आला. अन्वरची पत्नी देहविक्रीसाठी आणलेल्या मुलींच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम करत असे. परंतु ती गर्भवती असल्यामुळे दुसऱ्या मुलीवर ही जबाबदारी सोपवली होती. बाप असल्याची बतावणी- आॅक्टोबर २०१४मध्ये वाशी पोलिसांनी छापा टाकून संबंधितांवर कारवाई केली. मुलींना चेंबूरच्या महिला सुधारगृहात पाठवले होते. त्या वेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे अन्वरने ती त्याचीच मुलगी असल्याचे सांगून पुन्हा ताब्यात घेतले होते. शिवाय आजपर्यंतच्या कामाचे पैसे पाहिजे असतील तर सोबत चल, असे धमकावले होते.
स्वत:ची सुटका इतरांना साहाय्य...
By admin | Published: June 30, 2015 11:59 PM