मुंबई : गरीब आणि अनाथ मुलांची दिवाळीदेखील आनंदात जावी, यासाठी घाटकोपरमधील काही तरुणांनी एकत्र येऊन एक अनोखा उपक्रम राबवला आहे. घरातील भंगार सामान विकून या तरुणांनी काही पैसे जमा करत गरीब मुलांसाठी फटाके, मिठाई भेट देण्याचे ठरविले आहे. घाटकोपर असल्फा येथील शिवप्रेरणा व शिवप्रभा सोसायटीमधील अनेक तरुण-तरुणी दरवर्षी काही तरी वेगळा उपक्रम दिवाळीत राबवतात. यंदादेखील काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने येथील सर्व तरुण-तरुणी आणि लहान मुले एकत्र आली. परिसरात दिवाळीआधी साफसफाई करून घरातील सर्व भंगार जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार पेपरची रद्दी आणि काही भंगार सामान विकून त्यांनी सुमारे आठ हजार रुपये जमा केले. हे पैसे फारच कमी असल्याने तरुणांनी यंदा फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. घरातून मिळालेले फटाक्यांचे पैसेदेखील ग्रुपमध्ये जमा केले. या उपक्रमात लहान मुलांचा सहभाग लक्षणीय आहे. त्यानुसार मुलांनी तब्बल १८ हजार रुपये जमा करत गरीब मुलांसाठी मिठाई तयार करून घेतली. त्यानंतर उरलेल्या पैशांमधून मुलांसाठी काही भेटवस्तूदेखील घेतल्या. येत्या दोन दिवसांत एका सामाजिक संस्थेच्या मदतीने ही तरुण मंडळी रस्त्यालगत आणि अनाथालयात राहणाऱ्या मुलांना ही मिठाई आणि भेटवस्तू देणार आहेत. या मुलांच्या हातात या वस्तू दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्यासाठी दिवाळी असल्याचे मत या तरुणांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
भंगार विकून गरीब मुलांना दिवाळीत मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2015 12:59 AM