नायर रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:52+5:302021-05-10T04:06:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वांचा मानसिक ताण वाढत असल्याचे दिसून आले आहे. यात रुग्णालय किंवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वांचा मानसिक ताण वाढत असल्याचे दिसून आले आहे. यात रुग्णालय किंवा अन्य स्थितीमुळे कोरोना रुग्ण आणि कुटुंबियांचा ताण अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नायर रुग्णालयासह एका स्वयंसेवी संस्थेने कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.
नायर रुग्णालय आणि नारायणदास मोरबाई बुधराणी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ८८२८३१५८०५ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत दररोज या वेळेत समुपदेशन करण्यात येईल. नायर रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. हेनल शहा यांनी सांगितले, रुग्णालयात दाखल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही हेल्पलाइन आहे. या समुपदेशनासाठी संस्थेतील तज्ज्ञांना प्रशिक्षित कऱण्यात आले असून, कोरोनाच्या काळातील ताण-नैराश्याचे बारकावे सांगण्यात आले. तसेच, रुग्णालयाच्या आपत्कालीन बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना या समुपदेशनात समाविष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे प्रोग्राम मॅनेजर असलेले तुषार यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांच्या मनात कोरोनाविषयीची भीती, ताण, नैराश्य वाढले आहे. अशा स्थितीत हतबल रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक, भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कठीण काळात आपण एकटे नाही, तर एकत्र आहोत, हे त्यांना समजावून सांगणार आहोत आणि यावर एकत्र मात करू, असा धीरही देणार आहोत.
...........................