कोरोनाबाधितांसाठी पालिकेची हेल्पलाईन ठरतेय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:05 AM2021-06-23T04:05:37+5:302021-06-23T04:05:37+5:30
मुंबई : कोरोनाबाधितांच्या सोयीसाठी पालिकेने स्थापन केलेली हेल्पनाईन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी वरदान ठरत आहे. या हेल्पलाईनवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी ...
मुंबई : कोरोनाबाधितांच्या सोयीसाठी पालिकेने स्थापन केलेली हेल्पनाईन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी वरदान ठरत आहे. या हेल्पलाईनवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी न थकता आतापर्यंत तब्बल २६ लाख ८० हजारांहून अधिक कॉल हाताळले आहेत.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पालिकेच्या सर्व २४ विभागांत वॉर रूमची स्थापना करण्यात आली. त्यात २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुरू करण्यात आली. रुग्णालयात खाटा उपलब्ध करून देणे, रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेऊन त्याला गृह विलगीकरणाचा सल्ला देणे, घरी उपचार घेणाऱ्या बाधितास त्रास होऊ लागल्यास तत्काळ आरोग्य पथकासह रुग्णवाहिका पाठवून त्याला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यासह, विलगीकरण कक्ष-औषधांबाबत माहिती देण्याचे कामही या हेल्पलाईनमार्फत करण्यात आले. दुसरी लाट ओसरत असली तरी या हेल्पलाईनचे काम अहोरात्र सुरू आहे. त्यामुळे रुग्णासह त्याच्या नातेवाइकांना पालिकेची ही हेल्पलाईन सुविधा वरदान ठरत आहे.
किती कॉल हाताळले?
पहिल्या लाटेत – १८ लाख ७१ हजार १९९ (१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१)
दुसऱ्या लाटेत – ८ लाख ८ हजार ९०० (एप्रिल २०२१ ते २१ जून २०२१)
एकूण – २६ लाख ८० हजार ९९
मुंबईतील रुग्णस्थिती
एकूण रुग्ण – ७ लाख २२ हजार ४६१
कोरोनामुक्त – ६ लाख ९० हजार ४१७
उपचाराधीन – १४ हजार ४५३
मृत्यू – १५ हजार ३१५
काय प्रश्न विचारले जातात?
ऑक्सिजन, आयसीयू बेड, कोरोना प्रतिबंधासाठी औषधे, लसीकरणाविषयी माहिती या संदर्भात प्रामुख्याने विचारणा होते. कोरोना चाचणीचा अहवाल, प्रवासासाठी लागू असलेली नियमावली, रुग्णवाहिका, स्मशानभूमीशी संबंधित माहितीही विचारली जाते. त्याशिवाय विलगीकरण कक्षांची उपलब्धता, गृह विलगीकरणाच्या काळात घ्यावयाची काळजी, परिसरात निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात विनंतीही हेल्पलाईनकडे केली जाते, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.
स्पर्शविरहित भावनिक संवाद
- पालिकेची हेल्पलाईन ही केवळ कोरोनाबाधितांना उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित न ठेवता रुग्णांना भावनिक आधार देण्याचे कामही या माध्यमातून करण्यात आले. या विषाणूमुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेली अनावश्यक भीती, अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळल्यानंतर होणारी जिवाची घालमेल, नातेवाइकाच्या मृत्यूमुळे येणारा ताण दूर करण्याचा प्रयत्नही कर्मचाऱ्यांनी केला.
- हेल्पलाईनवर येणारा फोन हा वेगवेगळी गाऱ्हाणी घेऊन यायचा. समस्या सारख्या असल्या तरी प्रत्येकाची मांडण्याची पद्धत वेगळी असायची. त्यामुळे त्यांच्या कलाने घेताना वाणीवर ताबा ठेवावा लागत असे. या सगळ्यांत वॉररूमधील कर्मचाऱ्यांनाही कमालीचा ताण यायचा; पण कोरोनाला हद्दपार करण्याच्या ध्यासामुळे एकाही कर्मचाऱ्याने तक्रार केली नाही.