Join us

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यामुळे आशियाई देशात काळजीचे वातावरण - हेमंत महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:08 AM

मुंबई : अफगाणिस्तानात तालिबान बऱ्याच कालावधीनंतर सत्तेत परत आला आहे. यामुळे मध्य आणि दक्षिण आशियातील देशांपुढे काळजीचे वातावरण आहे. ...

मुंबई : अफगाणिस्तानात तालिबान बऱ्याच कालावधीनंतर सत्तेत परत आला आहे. यामुळे मध्य आणि दक्षिण आशियातील देशांपुढे काळजीचे वातावरण आहे. या स्थितीचा विचार करता तालिबानला मान्यता द्यावी की नाही, ही भारतासमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या काळात अफगाणिस्तानात गृहयुद्ध मात्र पेटेल, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे. रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

पंजशीरच्या लढवय्यांनी तालिबानला टक्कर देत बागलान प्रांतात त्यांनी ३०० तालिबान्यांना ठार केले, तर काही जणांना कैद केले आहे. इराणमधील मूळ हजारा, ताझिकी हे तालिबानविरोधक आहेत. ते पश्तुनी किंवा पठाणी नाहीत. त्यामुळे येत्या काळात गृहयुद्धात कोण जिंकेल वा हरेल, ते आताच सांगणे कठीण आहे. तालिबान्यांच्या या सत्तेवरील दाव्याच्या अनुषंगाने चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तान यांचा पाठिंबा आहे. पण रशिया, चीन, इराण यांचा त्यामागे असणारा दृष्टिकोन त्यांच्या त्यांच्या देशांसंबंधातील आहे. पाकिस्तान मात्र यानिमित्ताने तालिबानी दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात घुसविण्याची शक्यता आहे. मात्र या पार्श्वभूमीवर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असाही विश्वास यावेळी महाजन यांनी व्यक्त केला.