तूर्तास तात्पुरता पदभार : केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी जायसवाल रिलिव्ह
(फोटो -हेमंत नगराळ)
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी गुरुवारी पदभार सोडला. आता पोलीस महासंचालकपदाची धुरा ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नागराळे यांच्याकडे देण्यात आली असून, दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला. सध्या नागराळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला असून, लोकसेवा आयोगाच्या निवड समितीकडून त्याची निश्चिती झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
हेमंत नागराळे हे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, गेल्या सव्वादोन वर्षांपासून न्यायिक व तंत्रज्ञ विभागाचे (एल अँड टी) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. जायसवाल यांची ३० सप्टेंबरला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) निवड झाली आहे. त्यांच्या जागी नागराळे यांच्यासह १९८६च्या आयपीएस बँचचे आयपीएस व होमगार्डचे महासमादेशक संजय पांडये यांच्यात स्पर्धा होती. त्यामध्ये राज्य सरकारने नागराळे यांना पसंती दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांशी जायसवाल यांचे फारसे सख्य नव्हते. अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याला प्राधान्य दिले.
--------