लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलीस सध्या कठीण समस्येतून जात आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती केली असून, सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. तसेच पोलिसांनीही असे कृत्य करू नये जेणेकरून पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागेल; अन्यथा कडक कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
हेमंत नगराळे यांनी बुधवारी सायंकाळी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. ते मुंबईचे ७५ वे पाेलीस आयुक्त आहेत. या वेळी नगराळे यांच्या स्वागतासाठी सर्व सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा पोलीस आयुक्त कार्यालयात हजर होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांना सांगितले की, ‘सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक योग्य तपास करत असल्याची खात्री आहे. या प्रकरणात पोलीस दलातील जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सहआयुक्तांकडून वाझेंनी तपास केलेल्या गुह्यांचा आढावा घेण्यात येईल. अधिक माहिती घेत पुढील कारवाई करू. आता तपासाबाबत बोलणे योग्य नाही.’
एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचे नसते. मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहेत. समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती केली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांंचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सर्व आव्हानांना तोंड दिले. नैसर्गिक आपत्तीत जीव धोक्यात घालून कार्य केले आहे. त्यामुळे कोणीही मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागेल, असे कृत्य करू नये. नेहमी चांगले काम करा. वरिष्ठांनीही सर्व हालचालींवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.