Join us

... म्हणून वसंत मोरेंची राज ठाकरेंच्या सभेला दांडी, टीव्हीवरुनच पाहिलं भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 10:36 AM

या सभेला पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांची अनुपस्थिती होती. मोरे यांनी घरातूनच टीव्हीवर राज यांचं भाषण पाहिलं. 

मुंबई - तुमचे लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत. कोकणात कोणत्या भागात प्रकल्प येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का ? अशा कोणालाही जमिनी विकू नका, जागे राहा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांचे कान टोचले. राज ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा झाली. या सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक आले होते. मात्र, या सभेला पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांची अनुपस्थिती होती. मोरे यांनी घरातूनच टीव्हीवर राज यांचं भाषण पाहिलं. 

रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शनिवारी (६ मे) झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. पर्यटन, कोकणातील गडकिल्ले, कोकणात येणारे उद्योग आणि त्याच्या जमिनींच्या व्यवहारातील घोटाळा या साऱ्यांवर राज यांनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत सणसणीत प्रहार केले. तसेच, पक्ष नसलेला अध्यक्ष म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर, राजीनामा नाट्यावरुन शरद पवार आणि अजित पवार यांनाही लक्ष्ये केलं.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील राज यांच्या सभेसाठी येत असलेल्या मनसैनिकाच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती दिली. त्यामध्ये, एक मनसैनिक ठार झाल्याचं सांगताना, सर्वांनी नीट गाडी चालवण्याचं आवाहन केलं. तसेच, घरी जातानाही व्यवस्थित जावा, असेही सूचवले. राज यांच्या या सभेसाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणाहून आणि पुण्यातूनही मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मात्र, या सभेला हजेरी लावली नाही. मोरेंनी घरातच टिव्हीवरुन राज यांची सभा पाहिली. तर, सभेला न जाण्याचं कारणही त्यांनी ट्विट करुन सांगितलं. 

माझ्या सख्या भाचीचे उद्या लग्न असल्यामुळे मला रत्नागिरीच्या सभेला जाता आले नाही. पण, मी संपूर्ण सभा आज बहिणीच्या घरी बसूनच पाहिली, खुप छान मुद्दे साहेबांनी घेतल, असे म्हणत मोरे यांनी राज यांच्या सभेचं कौतुक केलयं. दरम्यान, वसंत मोरे यांना पक्षात डावललं जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. पुण्यात मोरेंना डावलून साईनाथ बाबर यांना अध्यक्षपद दिल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चाही रंगली होती. त्यातूनच, ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात जातील, अशीही चर्चा होती. मात्र, आपण राज ठाकरेंसोबतच कायम राहणार असल्याचं वसंत मोरे यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेपुणेरत्नागिरी