हिपॅटायटिस बी, सीची होणार आता मोफत तपासणी, मुंबईत सायन रुग्णालयाची केली निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:25 PM2023-04-20T12:25:36+5:302023-04-20T12:28:46+5:30
Mumbai: संपूर्ण देशात राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी देशातील काही वैद्यकीय महाविद्यालयाची निवड केली आहे. त्या रुग्णालयात मोफत निदान, उपचार आणि औषधे दिली जातात.
मुंबई : संपूर्ण देशात राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी देशातील काही वैद्यकीय महाविद्यालयाची निवड केली आहे. त्या रुग्णालयात मोफत निदान, उपचार आणि औषधे दिली जातात. मुंबईत सायन रुग्णालयाची याकरिता निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणांहून या आजारावरील उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. खासगी रुग्णालयात या आजारावरील उपचारासाठी मोठा खर्च येतो. विशेष म्हणजे या आजारासाठी दीर्घ काळ डॉक्टरकडे नियमित तपासणीसाठी आणि चाचणी करण्यासाठी रुग्णालयात जावे लागते.
कावीळसदृश लक्षणे असल्यास त्यांची चाचणी केली जाते. जर रुग्णाचे निदान हिपॅटायटिस बी किंवा सी झाल्यास त्याला तत्काळ गॅस्ट्रोइंट्रोलॉजी किंवा वैद्यकशास्त्र विभागातर्फे उपचार सुरू केले जातात. तसेच काही वेळेला शिबिरात रक्तदाते रक्त देतात त्यावेळी रक्तपेढीत रक्ताच्या पिशव्या नेल्यानंतर त्याच्या काही चाचण्या केल्या जातात. त्यात हिपॅटायटिसची चाचणी केली जाते. मात्र त्या रक्तदान केलेल्या काही दात्यांच्या चाचणीत काही वेळा हिपॅटायटिसचे निदान होते. त्यावेळी त्या रक्तदात्याला माहिती दिली जाते.
राज्य रक्तसंक्रमण परिषद काय म्हणते ?
राज्य रक्तसंक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना मार्च महिन्यात पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या रक्तकेंद्रातील जुने व नवीन अशा सर्व हिपॅटायटिस बी आणि सी पॉझिटिव्ह रक्तदात्याचे समुपदेशन करून पुढे औषधोपचारासाठी राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात पाठवावे. तसेच दर महिन्याला पाच तारखेच्या आत हिपॅटायटिस बी आणि सी पॉझिटिव्ह रक्तदात्याची माहिती रक्त संक्रमण परिषदेला सादर करावी.
सायन रुग्णालयात मोफत उपचार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे राबवित येणाऱ्या राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुंबईत सायन रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. त्या ठिकणी हिपॅटायटिसच्या सर्व रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार केले जातात. तसेच या सर्व रुग्णांची माहिती एकत्रित केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला आरोग्य विभागाच्या कार्यालयामार्फत कळविणे बंधनकारक आहे.
राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे या संदर्भातील पत्र मिळाले आहे. त्यानुसार विभागीय रक्तपेढीला दर महिन्याला अहवाल देणे अपेक्षित आहे. जर कुणी रक्तदाता हिपॅटायटिस बी आणि सी चा सापडला तर आम्ही त्याचे समुपदेशन करतो आणि त्यांनी पुढील
उपचार घ्यावे असे सांगण्यात येते. कारण अनेकांना जोपर्यंत तपासणी करत नाही तोपर्यंत त्यांना हिपॅटायटिस आहे हे कळत नाही.
- डॉ. हितेश पगारे, उपसंचालक, सर जे जे महानगर रक्तपेढी