हेपॅटायटिस क्लीन बोल्ड; वर्षभरात एकही मृत्यू नाही
By स्नेहा मोरे | Published: February 17, 2023 12:00 PM2023-02-17T12:00:12+5:302023-02-17T12:01:17+5:30
हेपॅटायटिस म्हणजे यकृताचा दाह होय. हा आजार विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे होतो.
स्नेहा मोरे,
मुंबई : मुंबईत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत हेपॅटायटिसच्या एकूण ५९२ रुग्णांची नोंद झाली. यात ३४९ बालरुग्णांचा समावेश आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षभरात हेपॅटायटिसमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
हेपॅटायटिसचे सहा प्रकार
अन्न व पाणी हेच हेपॅटायटीस पसरण्याची प्रमुख कारणे आहेत. हेपॅटायटीस व्हायरल इन्फेक्शनमुळे होत असल्याने त्या रोगजंतूच्या प्रकारानुसार त्याचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’ आणि ‘जी’ अशा सहा प्रकारांत विभाजन केले आहे. या सहा प्रकारांच्या रोगजंतूंमुळे होणाऱ्या आजाराच्या गंभीरतेमुळे संपूर्ण जगभर हा चिंतेचा विषय झाला आहे.
लक्षणे
हेपॅटायटिसची लागण झालेल्या काही जणांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. काहींमध्ये ती दिसतात. भूक न लागणे, मळमळणे आणि उलट्या, अतिसार, गडद रंगाची लघवी आणि पांढुरक्या रंगाची विष्ठा, पोटदुखी, कावीळ, त्वचा व डोळे पिवळसर होणे.
हेपॅटायटिस म्हणजे काय ?
हेपॅटायटिस म्हणजे यकृताचा दाह होय. हा आजार विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. या आजाराचे ए, बी, सी, डी आणि ई हे उपप्रकार आहेत.
अनेकदा ए आणि ई हे उपप्रकार दूषित पाणी व अन्नामुळे होतात. हेपॅटायटिस याचा अर्थच यकृत दाह किंवा त्याला येणारी सूज असा आहे. ग्रीक शब्दांपासून तो तयार झाला आहे. अल्कोहोल, पर्यावरणातील विषे व स्वयंप्रतिकारशक्ती रोग यातून यकृताला सूज येऊ शकते. हेपॅटायटिस सी विषाणू हा रक्त व शरीरातील द्रवातून पसरतो. त्यातून गंभीर आजार होतो. त्याला लिव्हर सिरॉसिस म्हणतात, त्यातून पुढे यकृताचा कर्करोगही होतो. रक्तातून पसरणारा हेपॅटायटिसचा विषाणू घातक होता, त्यात मृत्युदर जास्त होता. त्यातील मृत्यूंच्या संख्येची तुलना एचआयव्ही व क्षयाच्या मृत्युसंख्येशी होऊ शकते.
हे करा,
आजार टाळा
उघड्यावरील अन्नाचे
सेवन टाळा.
अन्न खाण्यापूर्वी हात
धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे.
तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या किंवा जुलाब असल्यास स्वत: औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उपचाराला विलंब केल्यास गुंतागुंत वाढून मृत्यूचा धोका संभावतो.
हेपॅटायटिस नियंत्रणासाठी पालिकेकडून दरवर्षी रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येते. त्याचप्रमाणे, रुग्णनिदान आणि उपचारांवर भर दिला जातो. याखेरीज, रुग्ण अर्धवट उपचार सोडणार नाही याविषयी सतर्कता बाळगण्यात येते. मागील काही वर्षांत हेपॅटायटिसचे मुंबईतील प्रमाण कमालीचे कमी झाले आहे.
- डॉ. मंगला गोमारे,
कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग, पालिका
स्पॉट मॅपिंग करण्यावर पालिकेची भर
अतिजोखमीचे क्षेत्र ओळखण्यासाठी रुग्णांच्या राहत्या ठिकाणचे स्पॉट मॅपिंग केले जाते. बाधित क्षेत्रात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून अधिकाधिक रुग्णांना शोधून दवाखान्यात पाठविले जाते. जल विभागातर्फे पाण्याचे नमुने दररोज तपासले जातात. क्लोरीन गोळ्यांचे वाटप केले जाते.
जगात दरवर्षी सात लाख मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, हेपॅटायटीसच्या जागतिक क्रमवारीत भारत देश पहिल्या १० मध्ये येत असून, ४ ते ८ टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात. आतापर्यंत जगातील दोन अब्ज लोक हेपॅटायटीसने बाधित झाले आहेत. जगातील प्रत्येक पंधरावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. जगात दरवर्षी सात लाख लोक यामुळे मृत्युमुखी पडतात.