- आकाश गायकवाड, डोंबिवली
लहानपणापासूनच दियाला झोपाळ्याची खूप आवड. याच झोपाळ्यावर झोके घेत ती मोठी झाली. झोपाळा जणू तिचा जीव की प्राण. शाळेतून किंवा बाहेरून घरी आली की, आवडत्या झोपाळ्यावर बसून गिरकी घेणे, हा नित्याचा कार्यक्रम. याच आवडत्या झोपाळ्यावर गिरकी घेताना त्याच्या दोरांचा फास गळ्याभोवती आवळला गेला आणि तिचा तो लाडका झोपाळाच तिच्यासाठी काळ बनला. गणेशनगर परिसरात पांडुरंग कॉम्प्लेक्समध्ये सचिन सरोदे, पत्नी श्रुती, आठ वर्षांची मुलगी दिया आणि दीड वर्षाचा जय असे कुटुंब राहते. सहा वर्षांपूर्वीच ते येथे राहायला आले. त्यांच्या टेरेस फ्लॅटमध्ये दियासाठी झोपाळा कायम टांगलेला होता. ती नेहमी त्यावर खेळत असे. दियाचे बालपण त्यावर खेळण्यात गेले. ती शाळेत जाऊ लागली, तरी तिचे त्यावरील खेळणे कमी झाले नव्हते. दियाला खेळणी, सायकल, घोडागाडी, मोबाइलपेक्षाही झोपाळाच खूप आवडायचा. तशी ती एरव्ही सोसायटीच्या अंगणात खेळायलाही जात असे. पण, पाऊस असल्याने घराच्याच गच्चीत खेळत होती. रविवारची सुटी असल्याने दियाचे बाबा घरातच होते. दुपारच्या जेवणानंतर सर्व जण आराम करत होते. पण, दिया पुस्तकांसोबत खेळत होती. नंतर, खेळताखेळता ती झोपाळ्यावर कधी गेली, ते आईवडिलांनाही कळले नाही. साधारण ४ च्या सुमारास आईने तिला हाक मारली, पण तिचा प्रतिसाद मिळत नसल्याने तिला शोधत टेरेसमध्ये गेली. तेव्हा दियाच्या गळ्याला झोपाळ्याचा फास लागल्याचे पाहून त्यांनी किंकाळीच फोडली. त्यांचा आवाज ऐकून पती सचिनसह शेजारचे धावून आले. त्यांनी तिला त्वरित जवळच्या स्पर्श हॉस्पिटलमध्ये नेले. पण, तेथील डॉक्टरांनी त्यांना महापालिकेच्या शास्त्रीनगर रु ग्णालयात नेण्यास सांगितले. पण, शास्त्रीनगरला नेईपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. तेथील डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दत्तनगरच्या मोक्षधाम स्मशानभूमीत सोमवारी सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिया साउथ इंडियन शाळेत सिनिअर केजीत शिकत होती. तिला कॉम्प्युटर, चित्रकलेबरोबरच बार्बी डॉल खूप आवडत होती. हुशार आणि बोलक्या स्वभावामुळे वडिलांसह आजीआजोबांचीही ती लाडकी होती, असे तिचे काका सचिन इंगळे यांनी सांगितले. दियाचा जन्म झाला, तेव्हा तिच्यासाठी घरात रस्सीचा पाळणा टांगला होता. तिला झोपाळा खूप आवडत असल्याने नंतर दोरीचा झोपाळा आणण्यात आला आणि त्याच झोपाळ्याच्या दोरीने तिचा घात केल्याची भावना आईवडिलांसह आमची असल्याचे त्यांनी सांगितले. आपण घरात असतानाही दियाला वाचवण्यासाठी काहीही करू शकलो नाही, याचा मोठा धक्का तिच्या आईवडिलांना बसला आहे.