दहिसरमधील घटना; चिमुकलीमुळे उलगडले ‘दृश्यम’कांड,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साहेब माझे पती हरवले आहेत, अशी तक्रार घेऊन विवाहितेने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीही तत्काळ शेजारी, नातेवाइकांसह मित्रमंडळींकडे शोध सुरू केला. तपास सुरू असताना ११ दिवसांनी ६ वर्षांच्या मुलीने वडील हरवले नसून, त्यांची आईनेच हत्या केल्याचे व मृतदेह घरातच पुरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे तुकडे सापडले आणि ‘दृश्यम’ सिनेमातील दृश्याप्रमाणे रंगणाऱ्या थरारक नाट्याचा मुलीमुळे पर्दाफाश झाला. ही धक्कादायक घटना दहिसरमध्ये उघडकीस आली.
पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये राहणाऱ्या रहीस करामत अली शेखचे २०१२ मध्ये शाहिदाशी लग्न झाले. लग्नानंतर हे दोघेही दहिसर पूर्वच्या खान कंपाउंडमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. शेख दहिसर पूर्वेकडील एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्याची पत्नी ही सहा वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षांच्या मुलासोबत घरीच असायची. याच काळात शेजारी राहणाऱ्या अनिकेत ऊर्फ अमित मिश्रासोबत शाहिदाचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. ही बाब शेखला समजताच त्याने विरोध केला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले.
त्यामुळे शाहिदाने शेखच्या हत्येचा कट आखला. २२ मेच्या रात्री वायरच्या साहाय्याने शेखचा गळा आवळून हत्या केली. शाहिदाने मुलीसमोरच प्रियकराच्या मदतीने पतीचे चार तुकडे करून मृतदेह किचनमध्ये ३ फूट खोल खड्डा खणून त्यात पुरला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास वडिलांप्रमाणेच तुझी हत्या करू, अशी धमकी त्यांनी मुलीला दिली.
त्यानंतर शाहिदाचा पती अचानक बेपत्ता झाल्याचे समजताच शेजारी, तसेच मित्रमंडळींमध्ये चर्चा रंगू लागल्या. त्यामुळे २५ मे रोजी शाहिदाने पोलीस ठाणे गाठून २१ तारखेपासून पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दृश्यम सिनेमातील दृश्याप्रमाणे हत्या केली तरी, आपण काही केले नसल्याचा आव आणत शाहिदाचा दिनक्रम सुरू होता. किचनमध्ये नियमित जेवणही सुरू होते. मात्र, मुलीमुळे हे दृश्यमकांड उघड झाले.
* असा मिळाला चाैकशीला यू टर्न
पोलिसांकडून चाैकशी सुरू असताना ११ दिवसांनंतर घाबरलेल्या मुलीने पोलिसांना आईनेच वडिलांची हत्या केल्याचे सांगताच, पोलिसांनी शाहिदाकडे उलट तपासणी सुरू केली. मात्र, ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांनी घरात पाहणी सुरू केली. तेव्हा किचनमधील तीन फरशा काहीशा उखडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ खोदकाम सुरू केले. तेव्हा ३ फूट खोल खड्ड्यात शेख यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.
..................................