मुंबई : स्वीडनसारख्या प्रगत देशात सुखवस्तू घरात चौकोनी कुटुंबाचा सुखाचा संसार, मुलं १२-१३ वर्षांची, नवरा उत्तम कमाई असलेला, स्वत: उच्चशिक्षित... असे सारे सुखचित्र असताना ‘ती’ला ‘कोहम’ अर्थात मी कोण आहे, प्रश्न सतावू लागला. बालपणीच्या पुसटशा आठवणी मनात पिंगा घालू लागल्या आणि त्यामुळे अस्वस्थ होऊन ‘ती’ने थेट मुंबई गाठली, आपला भूतकाळ शोधण्यासाठी...
ॲना ग्रॅहन. वय ४६. लहानपणीची सीताबाई. सध्या मुंबईत आली आहे. आपल्या दुरावलेल्या आई-बाबांना आणि भावाला शोधण्यासाठी. तिच्या आठवणींच्या चौकटीत आता फक्त एकच चित्र आहे, ते म्हणजे टेकडीवरचे झोपडीवजा घर. अंगणात तिचे केस विंचरणारी आई. पायाला जखम झाली म्हणून पाठीवर घेऊन जाणारे वडील आणि लहान बहिणीची मायेने काळजी घेणारा भाऊ. या आठवणींचे गाठोडे सोबत घेऊन आलेल्या ॲनाला आता या चित्रातल्या प्रत्येकाला शोधून काढत त्यांच्याशी सुखसंवाद साधायचाय. सोबतीला फक्त चार वर्षांची असतानाचा मानखुर्द येथील बाल सुधारगृहातील फोटो आणि सीताबाई या नावाची ओळख आहे. याच आधारे ती मुंबईतील टेकड्या आणि त्यावर असलेल्या झोपडपट्ट्यांसह आजूबाजूचा परिसर पिंजून काढत आहे. मला तुम्ही ओळखता का, तुम्ही माझ्या आई-बाबांना पाहिलेत का, अशी विचारणा करून ती आपल्या कुटुंबाचा शोध घेत आहे. नवीन वर्षात आई वडिलांना शोधण्याचा संकल्प तिने केला आहे.
१९८० मध्ये सीताबाई चार वर्षांची असताना काळाचौकी पोलिसांना सापडली. पुढे तिची रवानगी बालसुधारगृहात झाली. पुढच्याच वर्षी स्वीडनच्या डायटर सेल आणि बिर्गिट सेल कुटुंबीयांनी सीताबाईला दत्तक घेतले. सीताबाईची ॲना झाली. आयुष्याला नवे वळण मिळाले. ॲनाच्या नव्या पालकांनी तिला लाडाकोडात वाढवले. उच्च शिक्षण देत स्वत:च्या पायावर उभे केले. ॲनाने संस्कृती आणि पर्यटन या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. स्वीडन आणि न्यूझीलंडमध्ये मार्केटिंग केले आणि आता विशेष किशोरवयीन व्यक्तींसोबत शिक्षिका म्हणून काम करते.
स्वीडनमधील क्रिस्टियन ग्रॅहन यांच्याशी तिचा विवाह झाला. ती दोन मुलांची माता आहे. मात्र, ॲनाला आता आपल्या खऱ्या आई-वडिलांच्या भेटीची आस लागली आहे. त्यासाठी ती मुंबईत आली आहे. मानखुर्दमधील बाल सुधारगृहात येताच आठवणींनी व्याकूळ झालेल्या ॲनाने हंबरडा फोडला तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.कोट्स..
टेकडीवरचे घर, आई-बाबा आणि भाऊ एवढेच डोळ्यासमोर येते. बाल सुधारगृहात माझा भाऊही होता. तो माझी काळजी घ्यायचा. मात्र, नंतर पुढे काय झाले काहीच आठवत नाही.- ॲना ग्रॅहन
पोलिसांकडून मदतीची अपेक्षा
२०१९ मध्येही ॲना पती आणि मुलांसोबत मुंबईत आली होती. काळाचौकी पोलिसांची भेटही घेतली. मात्र, बाल सुधारगृहात मुलांबाबतचा १९८० पूर्वीचा रेकॉर्ड उपलब्ध नाही. ॲनाच्या रेकॉर्डनुसार ती मराठी भाषिक आहे. तसेच ती संस्थेत असताना हिंदीमध्येही बोलत होती. गेल्या तीन वर्षात पोलिसांकडून मदत मिळाली नाही. मुंबई पोलिसांनी सहकार्य करावे.
- अॅड. अंजली पवार, दत्तक हक्क परिषद, संस्थापक सदस्य, पुणे.