हर्बल हुक्क्याला न्यायालयाची परवानगी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:43 AM2019-07-16T05:43:05+5:302019-07-16T05:43:12+5:30
तंबाखूमुक्त हर्बल हुक्का ग्राहकांना पुरविण्याची मुभा शहरातील एका रुफ-टॉप रेस्टॉरंटला उच्च न्यायालयाने सोमवारी दिली.
मुंबई : तंबाखूमुक्त हर्बल हुक्का ग्राहकांना पुरविण्याची मुभा शहरातील एका रुफ-टॉप रेस्टॉरंटला उच्च न्यायालयाने सोमवारी दिली.
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायद्यातील तरतुदी तंबाखूमुक्त हर्बल हुक्क्याला लागू होत नाहीत. त्यामुळे राज्य सरकार व मुंबई महापालिकेला आपल्या रेस्टॉरंटवर कारवाई न करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती मुंबईतील तीन रेस्टॉरंटचा मालक अली रेझा अब्दी याने उच्च न्यायालयाला केली. अब्दी यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे होती.
अब्दी यांच्या मालकीची मुंबईत तीन रेस्टॉरंट आहेत. ४०० हून अधिक कर्मचारी या तिन्ही रेस्टॉरंटमध्ये काम करीत आहेत.
उच्च न्यायालयाने अब्दी यांना त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये तंबाखूमुक्त हर्बल हुक्का ग्राहकांना पुरविण्याची मुभा दिली. मात्र, भविष्यात त्यांनी तंबाखूयुक्त हुक्का ग्राहकांना दिला तर संबंधित प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळे आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
२८ डिसेंबर २०१७ रोजी कमला मिल कम्पाउंडमधील दोन हुक्का पार्लरला आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारने सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यात सुधारणा करून सर्व रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर चालविण्यास सरसकट बंदी घातली. त्यात हर्बल हुक्क्याचाही समावेश केला. या बंदीला अब्दी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
हर्बल हुक्कामध्ये तंबाखूजन्य पदार्थ नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी एफएसएल अहवाल मागविण्यात आला. त्यांनी या हर्बल हुक्क्यात तंबाखू नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे अब्दी यांचे वकील सुजोय काथावाला यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करत अब्दी यांना त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्का पुरविण्याची परवानगी दिली.