- मनीषा म्हात्रे, मुंबईइमारतीच्या चहुबाजूंनी उगवलेली रोपटी, त्यात इमारतीच्या आतील भागाला गेलेले तडे, त्यातून सुरू असलेली गळती, अशा दयनीय अवस्थेत मुलुंडचे कामगार रुग्णालय सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. त्यातही अशा जीवघेणा उपचार केंद्रात रुग्णांना औषधांसाठी रुग्णालयाबाहेर जाण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. पूर्व आणि मध्य उपनगरांतील कामगारांसाठी मुलुंड एलबीएस रोडवरील कामगार रुग्णालय हा एकमेव आधार आहे. या रुग्णालयामुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. दिवसाला शेकडो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी यायचे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील शेड कधीही कोसळू शकते. त्यामुळे पहारा देणारे सुरक्षारक्षकही जीव मुठीत धरून येथे ड्युटी करतात. इमारतीच्या भिंतीमध्ये चहूबाजूंनी रोपटी उगवल्याने बराचसा भाग कोसळू लागला आहे. त्यात इमारतीच्या आतील अनेक भिंतींना तडे गेले आहेत. यात प्रसूती वॉर्डची अवस्था फारच दयनीय आहे. येथे दाखल होणाऱ्या महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकेक दिवस जीवघेणा ठरत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. रुग्णांच्या खाटेशेजारी सुरू असलेली गळती, तसेच येथील शौचालयेही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अनेकदा येथील स्लॅबच्या काही भागांची पडझड होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. त्यात चार लिफ्टपैकी एक लिफ्ट बंद असल्याने त्याचाही फटका रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना बसतो. अशा परिस्थितीमुळे काही वॉर्र्ड बंदही करण्यात आले होते. दोन शस्त्रक्रिया विभागांपैकी एक विभाग बंद असून, त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. औषधांसाठी रुग्णालयाबाहेर जाण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे काही रुग्णांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यात कर्मचारीवर्गावर अतिरिक्त भार आहे. त्यात परिचारिका, कक्षसेवक, कक्षसेविका, प्रयोगतंत्रज्ञांचा तुटवडा असल्याने एकावेळी एका परिचारिकेवर तीन वॉर्ड सांभाळण्याची वेळ ओढावते. अशात पाच ते सहा कक्षसेवकांचे काम एकावर पडत असल्याने त्यांची यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसमट होताना दिसते. त्यामुळे रुग्णांबरोबर याचा फटका कर्मचारीवर्गाला बसत असत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अशात पदोन्नती, पेन्शनच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे पायपीट करावी लागते. (उद्या भाग ३- कक्षसेवक वाहताहेत रुग्णांचे ओझे -वरळी कामगार रुग्णालय)भरती प्रक्रियेत संशयाचा धूर...रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. त्यात कर्मचारीवर्गाच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबत मी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती आमदार सरदार तारासिंह यांनी दिली. कंपन्या औषध पुरवित नाहीत...जुनी औषध बिलांची थकबाकी असल्याने कंपन्या कामगार रुग्णालयांना औषधे पुरवित नाहीत. रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून कर्जामार्फत औषधांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो. त्यात शासनाकडून वर्षाला ठरावीक निधी दिला जातो, मात्र तो अपुरा आहे. अशात परिचारिका तंत्रज्ञांची कमतरता आहे. त्याचीही पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतींच्या दुरवस्थेबाबत पीडब्लूडीकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्यांचेही हाथ अपुऱ्या निधीअभावी बांधले गेल्याची कारणे दाखवत असल्याचे रुग्णालयाच्या अधीक्षिका नूतन सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रशासनाने दखलघेणे गरजेचे...धोकादायक इमारती कोसळून अनेकांचा बळी जात आहे. अशात जेथे उपचार मिळतात त्या ठिकाणाची अवस्था जीवघेणी झाल्याने प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखण्याची गरज असल्याचे रुग्णाचे नातेवाईक अजय अहिरे यांनी सांगितले.
येथे होतात जीवघेणे उपचाऱ़़!
By admin | Published: August 15, 2015 2:11 AM