Join us

येथे आली माणुसकीची प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:06 AM

मॉलची आग विझविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान गुरुवारी रात्रीपासून कार्यरत हाेते. शुक्रवारची रात्र झाली तरी आग विझविण्याचे काम सुरूच ...

मॉलची आग विझविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान गुरुवारी रात्रीपासून कार्यरत हाेते. शुक्रवारची रात्र झाली तरी आग विझविण्याचे काम सुरूच होते. एवढ्या वेळ काम करणाऱ्या जवानांना पाणी, चहा आणि बिस्किटे देण्यासाठी लगतच्या परिसरातील रहिवासी सरसावले होते. आवश्यक मदत स्थानिकांकडून केली जात होती. काय हवे काय नको, याची आपुलकीने विचारपूस केली जात असल्याचे चित्र होते.

* धुरात गुदमरला श्वास

मॉलच्या मागील आणि पुढील बाजूस लागलेल्या आगीतून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडत होता. धूर सातत्याने परिसरात पसरत असल्याने येथे एक प्रकाराचा दर्पही जाणवत होता. यामुळे काही प्रमाणात श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे चित्र होते.

* सगळे रस्ते बंद

भांडुप रेल्वेस्थानकाकडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. येथील मार्ग वळविण्यात आले होते. बेस्ट बससह उर्वरित वाहतूक वळविण्यात आल्याने मोठा फेरफटका मारून म्हणजे भांडुप पूर्वेकडून मुलुंड आणि कांजूर गाठावे लागत असल्याचे चित्र होते. येथील मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती प्रवाशांना नसल्याने त्यांना मोठा वळसा बसत होता. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील प्रमुख भाग बंद करण्यात आल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागत होती.

* दोन्ही हायड्रंट सुरू, एक वापरला

मॉलच्या मागील बाजूस दोन फायर हायड्रंट असून, यांपैकी एक मुंंबई महापालिकेच्या एस विभागाच्या जल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच सुरू केला होता. मुंबई अग्निशमन दलाचा एक पाइप हायड्रंटला जोडून आग विझवण्यासाठी यातील पाणी मोठ्या दाबाने वापरले जात होते. सकाळपासून याद्वारेच येथील आग विझवण्यात आली. शिवाय एस विभागाने येथे अतिरिक्त पाण्याचे टँकर पाठविल्याचे येथे तैनात कर्मचाऱ्याने सांगितले.

* बघ्यांची गर्दी, सेल्फीसाठीची धडपड

मॉलच्या समोरील आणि मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामात अडथळे येत होते. तरीही लोक ऐकत नसल्याचे चित्र होते. शेवटी पोलिसांनी दम दिल्यानंतर लोक पांगले. तरीही दुरून आगीचा व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. काहींनी तर चक्क सेल्फी काढल्याचे चित्र होते.

* गाळे जळाले

मॉलमध्ये छोटेमोठे असे चार हजार गाळे आहेत, असे दुकानदारांनी सांगितले. यातील दोन हजार अद्याप बंद होते. तर उर्वरित सुरू झालेल्या दोन हजार गाळ्यांना आगीची झळ बसल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान झाल्याचे दुकानदारांनी सांगितले.

-----------

पाण्याचे १५० बॉक्स वाटले

मॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, मुंबई अग्निशमन दलाचे जवान, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत कार्यरत होते. त्यांना भर उन्हात काम करताना पाहून त्यांची तहान भागविण्यासाठी येथेच एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या शकील खान यांनी पाण्याचे तब्बल १५० बॉक्स वाटले. त्यांच्या कंपनीनेच त्यांना पाणी देण्यास सांगितल्याचे शकील खान यांनी सांगितले.

-----------

कामगार रस्त्यावर उभे

आग लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ६०४, ६०६, ६०५ या बस भांडुप पश्चिम स्टेशनवरून सुटत नव्हत्या. स्टेशनवरील डेपो तात्पुरता हलवला. स्टेशनवरील रिक्षांचा थांबाही हलवण्यात आला. त्यामुळे पश्चिमेकडील सर्वच लोकांची सकाळपासूनच बरीच गैरसोय झाली. मॉलमधील विविध कार्यालयांतील कामगार रस्त्यावर उभे असलेले, तर काहीजण जागा मिळेल तिथे बसलेले पाहायला मिळाले. स्टेशनकडील गेटमधून आत गेल्यास तेथील काही दुकाने सुरू होती. शिवाजी तलाव, अशोक केदारे चौक, टेंबीपाडा व त्यापुढील सर्वच स्टॉपवर बस येत नसल्याने लोकांचे हाल झाले. बस नसल्याचा सूचनाफलक यांपैकी एकाही थांब्यावर लावलेला नव्हता. त्यामुळे प्रवासी अर्धा तास बसची वाट पाहून कंटाळून रिक्षा शोधताना दिसले. रिक्षाही फक्त टँक रोडपर्यंतच सेवा देत होत्या.