मुंबई : औद्योगिक विकास आणि वाढते शहरीकरण यामुळे वृक्षतोड होत आहे. मोबाइल टॉवर्स उभारले गेले आहेत. गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. जंगले कमी झाली आहेत. घराच्या आसपास वृक्षे नाहीत. वळचणी नष्ट झाल्या आहेत. या सगळ्याचा फटका चिमण्यांना बसत आहे. परिणामी, चिमणी संवर्धनासाठी मुंबापुरीत ठिकठिकाणी मोठे काम सुरू असून, बहुतांश ठिकाणी चिमणी संवर्धनाला यशही हाती येत आहे. चिमण्यांच्या संवर्धनासाठी ‘बर्ड गॅलरी’ उभारण्यात येत असून, या माध्यमातून संवर्धनाचे काम सुरू आहे.मुंबापुरीत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, स्पॅरोज् शेल्टरसारख्या संस्था पक्षीसंवर्धनासाठी कार्यरत आहेत. सोसायटीकडून पक्षीसंवर्धनासाठी उल्लेखनीय पावले उचलली जात असून, जनजागृती केली जात आहे. स्पॅरोज् शेल्टरकडूनदेखील मोठ्या प्रमाणावर काम केले जात असून, बोरीवलीसह सांताक्रुझ येथे गॅलरी सुरू करण्यात आल्याचे संस्थेचे प्रमोद माने यांनी सांगितले.राज्यपाल, मुख्यमंत्री यांना भेटत त्यांना घरटी भेट देण्यात आली. चिमणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. सचिन तेंडुलकर, श्री श्री रवीशंकर, शुभा राऊळ, विद्या बालन, रवीना टंडन, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, भरत दाभोळकर यांना चिमण्यांचे घरटे भेट म्हणून देण्यात आले आहे. दरम्यान, टीशर्ट पेंटिंग, शिल्प रंगवा स्पर्धा, बक्षीस योजना, चिमणी आकाराचे विद्यार्थी प्रदर्शन, शाळा, महाविद्यालये, मॉल्ससह वॉटरपार्क येथे प्रदर्शन आणि जनजागृती केली जात आहे.एक चिमणी एका वेळी तीन ते चार अंडी घालते.सहा महिन्यांनंतर पुन्हा तीन अंडी घालते. म्हणजे एक चिमणी प्रतिवर्ष सहा ते आठ चिमण्यांना जन्माला घालते.चिमणीचे वजन साधारणपणे २८ ते ३६ ग्रॅम असते.तिचे आयुष्य फारच अल्प म्हणजे अडीच ते तीन वर्षे असते.घराच्या खिडकीत चिमणीचे घरटे लावावे.आयताकार द्विभागी पसरट भांडे ठेवावे.एका भागात अन्न, दुसरीकडे पाणी ठेवावे, भांड्याचा काठ दोन इंचांपेक्षा जास्त नसावा.नर चिमणीच्या मानेवर काळा ठिपका असतो, मादीच्या मानेवर काळा ठिपका नसतो.चिमण्या चालत नाहीत तर उड्या मारतात.चिमणी संवर्धनासाठी एक्झोरा, अडुळसा, मेंदीसारखी स्वदेशी झाडे लावावीत.
येथे होत आहे चिमण्यांचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 4:39 AM