इथे मरण स्वस्त आहे; प्रशासकीय कारवाईचा फक्त आणि फक्त दिखावाच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:18 AM2019-07-21T01:18:40+5:302019-07-21T01:19:02+5:30
बळींचा आलेख वाढताच । दुर्घटना घडूनही अधिकाऱ्यांचा तपास कासवगतीने
मुंबई : जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमधील शस्त्रक्रियेदरम्यान ५ जणांना दृष्टी गमवावी लागली. फोर्ट येथे हिमालय पूल कोसळून ७ जणांचा बळी गेला. मालाड येथे जलाशयाची भिंत कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला. डोंगरी येथे केसरबाई इमारत कोसळून १३ जणांचे जीव गेले. या सर्व घटनांमध्ये मुंबईकरांचे नाहक बळी जात असून, प्रशासन मात्र हातावर हात धरून बसले आहे. या सर्व प्रकरणात अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदार यांच्यावर नाममात्र कारवाई होत असून, घटनांना काही दिवस उलटतात, तोवर ये रे माझ्या मागल्या सुरू होते. परिणामी, ठोस अशी कोणतीच कार्यवाही प्रशासनाकडून होत नसून, ‘इथे मरण स्वस्त...’ असल्याचे चित्र आहे.
१४ मार्च रोजी घडलेल्या हिमालय पूल दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. पुलाच्या या दुर्घटनेनंतर महापालिका खडबडून जागी झाली. कंत्राटदार, अभियंता आणि स्ट्रक्चर आॅडिटर यांच्यावर कारवाई झाली. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महापालिकेने मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक पुलांचे पाडकाम हाती घेतले. धोकादायक पुलांची यादी बनविली. ऐन पावसाळ्यात रस्ते, पूल बंद करून मुंबईकरांची कोंडी केली.
४ जानेवारी रोजी मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून, लेन्स बसविलेल्या सातपैकी पाच रुग्णांना जंतुसंसर्ग झाल्याने दृष्टी गमवावी लागली. प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणी चौकशी करून लेखी माहिती सादर करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचे बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात नाममात्र कारवाई वगळली, तर पुढे काहीच झाले नाही.
मालाड येथे जलाशयाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३० बळी गेले. महत्त्वाचे म्हणजे, महापालिकेच्या जलाशयाच्या भिंतीसाठी तब्बल २१ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. दीड वर्षातच ही भिंत कोसळली. दुर्घटना घडल्यानंतर या प्रकरणी पालिकेने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली. सखोल चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली. पुढे काहीच झाले नाही. अशी कित्येक बांधकामे कोसळून मुंबईकरांचे जीव जात असतानाच महापालिका मात्र मूग गिळून गप्प आहे.
आपत्कालीन घटनांचे सत्र सुरू असतानाच नुकतेच डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळली आणि १३ जणांचा बळी गेला. या प्रकरणी महापालिकेने बी विभागाचे सहायक आयुक्तांचे निलंबन केले. मात्र, त्यापुढे महापालिका गेलीच नाही. केवळ बी विभाग नाही, तर मुंबईमधील कित्येक विभागात अनधिकृत बांधकामांचे मजले रचले जात आहेत. कुर्ला, अंधेरी, वांद्रे अशा महत्त्वाच्या ठिकाणांसह पश्चिम उपनगरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठे आहे. हीच बांधकामे कोसळून मुंबईकरांचा बळी जात असताना पालिका मात्र हातावर हात धरून बसली आहे.
अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष
मुंबई शहर आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करता यावी, यासाठी महापालिकेने उल्लेखनीय पावले उचलेली नाहीत. विशेषत: कुर्ला परिसरात कित्येक ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली जात या असून, याकडे महापालिकेने सपशेल कानाडोळा केला आहे. केवळ अनधिकृत बांधकामे नाही, तर हिमालय पूल दुर्घटना असो, जोगेश्वरी येथील शस्त्रक्रियेनंतर दृष्टी जाण्याची घटना असो, मालाड येथील भिंत पडल्याची घटना असो वा डोंगरी येथील इमारत पडल्याची घटना; अशा प्रत्येक घटनांत कागदोपत्री कारवाई वगळली तर महापालिकेने ठोस अशी कोणतीच कृती केलेली नाही.
मालाड दुर्घटना
- मालाड येथे पालिकेचे जलाशय आहे. त्यातून पश्चिम उपनगराला पाणीपुरवठा केला जातो.
- जलाशयाच्या सुरक्षेसाठी आरसीसीची भिंत ओमकार इंजिनीअर अँड कॉन्ट्रॅक्टरने बांधली.
- १५ डिसेंबर, २०१५ मध्ये भिंत बांधण्यास सुरुवात झाली.
- १५ नोव्हेंबर, २०१७ रोजी भिंत पूर्ण झाली.
- भिंतीच्या बांधकामासाठी २१ कोटी, ७ लाख, ८३ हजार रुपये खर्च आला.
- ओमकार कंपनी नालेसफाईत दोषी असून, तिला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
हिमालय दुर्घटना
- पालिकेने २९ पुलांचे पाडकाम, पुनर्बांधणीचे काम सुरू केले असून, २९ पैकी ८ पूल पाडण्यात आले आहेत, तर १२ पुलांचा वापर बंद करण्यात आला आहे. १२ पूलही पाडण्यात येणार असून, उर्वरित पूल लवकरच बंद करत पाडण्यात येणार आहेत. मात्र, हे करताना मुंबईकरांच्या होत असलेल्या गैरसोयीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
- मुंबई महापालिकेच्या अखत्यारित ३४४ पूल
- ३०४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रगतिपथावर आहे.
- स्ट्रक्चरल ऑडिटनुसार २९ पूल धोकादायक आहेत.
इमारत कोसळल्याच्या दुर्घटना
- २०१३ मध्ये ५३१ दुर्घटना घडल्या. १०१ लोकांचा मृत्यू झाला.
- २०१४ मध्ये ३४३ दुर्घटना घडल्या. २१ लोकांचा मृत्यू झाला.
- २०१५ मध्ये ४१७ दुर्घटना घडल्या. १५ लोकांचा मृत्यू झाला.
- २०१६ मध्ये ४८६ दुर्घटना घडल्या. २४ लोकांचा मृत्यू झाला.
- २०१७ मध्ये ५६८ दुर्घटना घडल्या. ६६ लोकांचा मृत्यू झाला.
- २०१८ मध्ये ३५९ दुर्घटना घडल्या. ७ लोकांचा मृत्यू झाला.