इथं मिळेल तुम्हाला प्रश्नपत्रिका संच, 10 अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 09:12 AM2021-03-16T09:12:48+5:302021-03-16T09:15:44+5:30
कोरोनामुळे यंदा सुरक्षित अंतर, मास्कसह विविध कोरोनासंबंधीच्या उपाययोजना करून दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी राज्य मंडळाने सूचना दिल्या आहेत.
मुंबई - राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. त्यासाठी, विद्यार्थ्यांची तयारीही सुरू झाली आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळाच भरल्या नसल्याने विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यासंदर्भात खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच माहिती दिली आहे.
कोरोनामुळे यंदा सुरक्षित अंतर, मास्कसह विविध कोरोनासंबंधीच्या उपाययोजना करून दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी राज्य मंडळाने सूचना दिल्या आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्याही तारखा जाहीर करण्यात आल्या असून बारावीची प्रात्यक्षीक परीक्षा ५ ते २२ एप्रिल तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या १२ ते २८ एप्रिलदरम्यान होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेत कसोटी लागणार आहे. मात्र, बोर्डाची नियमित परीक्षाही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यासाठी, सरावास म्हणून विद्यार्थ्यांना प्रश्नसंचही उपलब्धन करुन देण्यात आले आहेत.
To help students of class Xth & XIIth prepare for exams, @scertmaha will be providing subject wise question banks. These will be available at https://t.co/Ugilxs0qsF. Students should avail of the benefit.
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 15, 2021
@CMOMaharashtra@AjitPawarSpeakspic.twitter.com/zzUJADTnCJ
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मदत व्हावी, यामुळे राज्य शिक्षण मंडळाकडून विषयानुसार प्रश्चसंच पुरविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना हा प्रश्नसंच संबंधित वेबसाईटवर उपलब्ध असून विद्यार्थ्यांना प्रश्नसंच डाऊनलोड करुन अभ्यासासाठी याचा उपयोग करावा, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलंय. प्रश्नसंच कसा डाऊनलोड करावा, हेही आपल्या ट्विटमध्ये वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय.
1 लाख 58 हजार 601 विद्यार्थी
राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १ लाख ५८ हजार ६०१ विद्यार्थी सर्वेक्षणात सहभागी झाले होते. त्यातील ७१ टक्के म्हणजे १ लाख १२ हजार ७९४ विद्यार्थी बारावीचे, तर ३६ हजार १३४ विद्यार्थी दहावीचे होते. ९ हजार ६७३ विद्यार्थी हे इतर इयत्तांचे होते. ऑनलाईन परीक्षा व्हावी, असे मत नोंदवत असतानाच वर्षभर चाललेल्या ऑनलाईन तासिकांबाबत असमाधानी असल्याचे मत ६९ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
परीक्षा ऑनलाईन घ्यावी
कोणत्या माध्यमातून परीक्षा घेण्यात यावी किंवा परीक्षा पद्धती काय असावी, या प्रश्नाला ६१ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घ्यावी, असा प्रतिसाद दिला. २० टक्के विद्यार्थ्यांना कशीही परीक्षा घेतली तरी चालेल, तर १९ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा लेखीच असावी, असे मत व्यक्त केले. परीक्षा लेखी झाल्यास केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा नसल्याचे ५३ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एप्रिल - मे महिन्यांत लेखी परीक्षा घेण्याबाबत ७९ टक्के विद्यार्थ्यांनी समाधानी नसल्याचे नमूद केले. परीक्षेसाठी अजून अभ्यासक्रम कमी करावा, असे मत ८४ टक्के जणांनी नोंदवले.