मुंबई : माथेरान येथील पर्यटनवाढीसाठी मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसी एकत्र येत विशेष संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नात आहे. देशी-विदेशी पर्यटकांना मिनीट्रेन सफरीचा आनंद घेता यावा, यासाठी मिनीट्रेन भाड्याने देण्याच्या प्रस्तावावर काम करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे आणि आयआरसीटीसी प्रस्ताव तयार करत असून रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर ही संकल्पना प्रत्यक्षात येईल.माथेरान येथे साधारणपणे रोज ७ हजार पर्यटक येतात. शनिवार-रविवारी पर्यटकांचा आकडा १२ हजारांपर्यंत पोहोचतो. माथेरान मिनीट्रेनची आसन क्षमता मर्यादित आहे. यामुळे बहुतांशी पर्यटकांना ‘माथेरानची राणी’ समजली जाणाऱ्या मिनीट्रेनचे तिकीट मिळत नाही. यामुळे पर्यटक नाराज होतात. यावर उपाय म्हणून नेरळ-माथेरान या २१ किमीच्या अंतरासाठी मिनीट्रेन आणि बोगी आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यासाठी मिनीट्रेन भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर त्वरित कामाला सुरुवात होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.आयआरसीटीसीनेदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे. याचबरोबर माथेरानमध्ये पर्यटकांच्या दृष्टीने विविध सोयी-सुविधादेखील पुरवण्यात येतील. आयआरसीटीसीच्या माध्यमाने एका क्लिकवर पर्यटकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यात माथेरानपर्यंत वाहनव्यवस्था, खानपान, राहण्याचे शुल्क, परिसरातील महत्त्वाची आणि ऐतिहासिक माहिती अशा सर्व बाबींचा समावेश असलेले विशेष पॅकेजही तयार करण्यात येणार, असे आयआरसीटीसीच्या अधिकाºयांनी सांगितले.माथेरानचा होणार कायापालटमाथेरान स्थानकाजवळ ‘फुडप्लाझा’ उभारण्यात येणार आहे. स्थानकालगत असलेल्या जागेत पर्यटकांना राहण्यासाठी बहुमजली विश्रामगृह उभारण्यात येईल. विश्रामगृहाला हेरिटेजचा लूक देण्यात येईल. रेल्वे ते आयआरसीटीसीकडे देखभाल-दुरुस्तीसाठी देणार आहे. त्याचबरोबर स्थानकालगतच ‘रेल्वे हॉटेल’ या संकल्पनेनुसार बोगीमध्ये हॉटेल सुरू करण्याचा मानस आहे. पर्यटकांना पूरक अशा सर्वसमावेशक खर्चाच्या विशेष पॅकेजची निर्मिती इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) करणार आहे.-अरविंद मालखेडे, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी (पश्चिम विभाग)
येथे मिनीट्रेन भाड्याने मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 2:27 AM