मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अखेर शिवाजी पार्क मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं शिवसेनेच्या दोन्ही गटामला परवानगी नाकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे, शिवसेना नेत्यांनी आनंद व्यक्त केला. तर, विरोधकांकडून त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नसून टोमणे सभा असल्याचं म्हटलं. तर, मनसेनंहीउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. मात्र, परवानगी मिळाल्यानंतरही दोन्ही गटांतील वाद एकमेकांवर टिका-टीपण्णी करण्यातून दिसून येत आहे. त्यातच, मनसेनंही उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ''वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो'', असे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. यापूर्वी राज ठाकरेंनीही वारसा विचारांचा असतो म्हणत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला होता. त्यानंतर, मनसेनं शिवसेनेवर टिका केली होती. आता, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन मनसेनं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.
दसरा मेळावा नसून टोमणे सभा
दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला त्याची टॅगलाईन होती हिंदुत्ववादी विचारांचे सोनं लुटण्यासाठी या, आता ज्यांना परवानगी मिळाली त्याठिकाणी हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळणार नाहीत. तर टोमणे ऐकायला मिळतील. गद्दार, वज्रमूळ, खोके, बेईमानी हेच शब्द असतील. ही टोमणे सभा असेल आणि खरा हिंदुत्ववादी विचार ऐकायचा असेल तर जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची सभा होईल तिथे हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळतील असं सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
वाजत गाजत या, पण परंपरेला गालबोट लागेल असे वागू नका
कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या बहिण, भावांनी आमच्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे. आमच्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये. सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल. न्यायदेवतेवर मी संशय घेतलेला नाही. आज लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे ठाकरे म्हणाले.