‘हेरिटेजची जपणूक आवश्यक’, स्ट्रक्चवेल कंपनीचे अध्यक्ष चेतन रायकर यांचं मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:50 AM2017-09-17T04:50:26+5:302017-09-17T04:50:36+5:30
अनेक कमर्शियल व व्यावसायिक इमारतींचे स्ट्रक्चर बनविणा-या मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीचे सदस्य आणि स्ट्रक्चवेल कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चेतन रायकर यांनी हाजी अली दर्गा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, राजभवन या हेरिटेज वास्तूंना कोणताही धोका न पोहोचवता वा त्यांच्या सौंदर्याला कोणतीही बाधा न आणता त्या व्यवस्थित दुरुस्त केल्या आहेत. तसेच ‘२६/११’च्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलचे नूतनीकरण करण्याच्या कामातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आपल्या या कामाची माहिती त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’वर सविस्तरपणे मांडली.
ताज हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम कसे मिळाले?
- आतंकवादी हल्ल्यात ताजच्या वास्तूला मोठी हानी पोहोचली होती. त्याच्या नूतनीकरणाबाबत जी चार सदस्यांची समिती नियुक्त
केली होती त्यातील चारही सदस्य मला वेगवेगळ्या संदर्भाने ओळखत होते. त्यामध्ये ताज प्रोजेक्टचे मुखर्जी यांनी माझे नाव सुचवले आणि इतरांनी ते एकमताने मंजूर केले. अतिरेक्यांचा हल्ल्यामुळे ताजमधील ३५० चौरस फुटांचे कार्पेट पूर्णपणे रक्ताने भिजून गेले होते. एखादे प्रेत खेचत नेल्याप्रमाणे ४० फुट रक्तांचा ओघळ पडलेला होता. मात्र मोठ्या जिद्दीने व सहका-यांच्या साथीने ते काम समर्थपणे पार पाडले. आम्ही मोठ्या हिमतीने ताजचे काम अवघ्या आठ महिन्यांत पूर्ण केले. जसे त्याचे पूर्वी होते तसेच रूप प्राप्त झाले. त्यात काडीमात्र बदल केला नाही.
हाजी अली दर्ग्यातील ९९ फुटी मिनारबद्दल काय सांगाल?
- इस्लाममध्ये अल्लाहची ९९ नावे आहेत, त्यामुळे ९९ फुटांचा मिनार बांधण्यात आला. या मिनारसाठी लोखंड किंवा कोणत्याही प्रकारचे सिमेंट आणि ब्रिक्स वापरलेले नाहीत. मिनारला इंटर लॉकिंक मार्बल ब्लॉक लावण्यात आले आहेत. प्रिन्स चार्ल्स हाजी अली
दर्ग्याचे बांधकाम पाहायला आले होते. त्यांचा ४५ मिनिटांचा सहवास लाभला होता. प्रिन्स चार्ल्स हे फक्त आर्किटेक्चर काम पाहायला आले होते.
आर्किटेक्चर कामाचा दर्जा खालावलेला जाणवतो?
- आर्किटेक्टलोकांना मटेरियलचे ज्ञान नसते. ‘जियोलॉजी’ हा दगडाचा विषय आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकवला जात नाही. कॉन्झर्वेशनमध्ये आर्किटेक्चर काम करतात. मी एमएसबीटीमधील सिव्हिल इंजिनीअरिंग कोर्स कमिटीचा चेअरमन आहे. तसेच अकादमी कमिटीवरसुद्धा आहे. त्या वेळी मी सांगितले होते, ‘रिपेअर’ हा विषय इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये समाविष्ट करावा. त्यानंतर २०१७ ते १८ पासून डिप्लोमा इंजिनीअरिंग कोर्सेसमध्ये १०० गुणांचा रिपेअर विषय घेण्यात आला.
कराड इंजिनीअरिंग बोर्डमध्ये या विषयाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. तिथे रिपेअर विषय इलेक्टीव्ह म्हणून शिकवण्यात येतो. आजच्या घडीला आर्किटेक्टआणि इंजिनीअर हे वेगवेगळ्या दिशेला तोंड करून प्रकल्पावर काम करतात. जर दोघांनी एकत्र येऊन काम केले, तरच काहीतरी नवीन निर्माण करता येईल.
वास्तूवर विविध प्रकारचे नक्षीकाम आणि मूर्ती कोरण्यामागील कारण काय?
- कोणी थुंकू नये यासाठी काही वास्तूंच्या भिंतीवर देवाच्या मूर्ती लावल्या जातात. ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तूंवर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. नक्षीकाम पाहून कोणालाही कधीच थुंकावेसे वाटत नाही. ग्रीक लोक इमारती बांधायचे त्यात प्राण्यांच्या प्रतिकृतींचे कॉलम बांधले जात होते. त्यामुळे मूर्तीकाम करणारे कारागीरदेखील कन्स्ट्रक्शन कामात होते. आता मूर्ती कामगारांची संख्या कमी झाली आहे. सद्य:स्थितीला पहिली बिल्डिंग बांधली जाते; मग त्यावर नक्षीकाम केले जाते. म्हणजे एखाद्या कुरूप बाईने जास्त मेकअप केला तर ती जास्तच विद्रूप दिसते, तशीच सध्याची स्थिती आहे.
जिवंत माणसांचे पुतळे बांधण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत आहे का?
- मी शिवाजी महाराजांचा निस्सीम भक्त आहे. शिवाजी महाराज हे देवाचे अंश होते, हे मी मानतो. जगाने मानावे हे आवश्यक नाही. जर का आपल्याकडे जिवंत माणसांचे पुतळे बांधण्याची पद्धत असती, तर शिवाजी महाराजांनी जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांचे पुतळे नक्कीच उभारले असते. पण पुतळे उभारायची पद्धत ब्रिटिशांची आहे. तर आपण फक्त देवाचे पुतळे बनवितो.
हेरिटेज आणि पर्यावरण यांचे संवर्धन का होत नाही?
- पर्यावरण हे आपले हेरिटेज असून त्याचे संवर्धन केले पाहिजे. आपण मूलभूत गरजेतूनच बाहेर आलेलो नाही. त्यामुळे जर माझे पोट भरलेले नाही, तर कसे संवर्धन होणार? पण विकासाच्या नावाखाली किती प्रमाणात हेरिटेजचा बळी द्यावा, वास्तूचा ºहास केला जावा, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
शब्दांकन : सागर नेवरेकर