Join us

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचा हेरिटेज वॉक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:06 AM

मुंबई : ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या दक्षिण मुंबईतील वास्तूंची सहल पर्यटकांना घडवून आणण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी ...

मुंबई : ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या दक्षिण मुंबईतील वास्तूंची सहल पर्यटकांना घडवून आणण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी ‘हेरिटेज लूक’ असलेला एक कि.मी.चा पदपथ तयार केला जाणार आहे. याद्वारे माणिक भवन, ऑगस्ट क्रांती मैदान अशा ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घडणार आहे.

जागतिक दर्जाच्या मुंबई शहराचा इतिहासही तेवढाच दमदार आहे. अशा वास्तूंचे संवर्धन करण्यावर पालिकेने आता भर दिला आहे. या शहराचा दर्जा राखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये मजबूत रस्ते, आकर्षक पदपथ, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण यांचा समावेश आहे. तसेच पर्यटकांसाठी हेरिटेज वास्तूंची सहल घडवण्याचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पालिका मुख्यालयातही हेरिटेज वॉक सुरू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर ग्रँट रोडच्या पंडित रमाबाई मार्ग येथून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत हा हेरिटेज वॉक असणार आहे.

हेरिटेज वॉकमध्ये या वास्तूंचे दर्शन...

* महात्मा गांधी यांचे वास्तव्य होते ते मणिभवन.

* ‘सेंट कोलंबा स्कूल’ ही शहरातील पहिली मुलींची शाळा.

* पंडिता रमाबाई हॉस्टेल.

* मुलींचे पहिले आर्य महिला समाज हॉस्टेल.

* ऑगस्ट क्रांती मैदान.

* पंडित रमाबाई मार्गापासून सुरू होणारा पदपथ सिमेंट काँक्रीटने बनवण्यात येणार आहे. या पदपथाला पुरातन दगडांप्रमाणे स्वरूप देण्यात येईल.

* पदपथाच्या दोन्ही बाजूंना सुशोभीकरण, दिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पदपथाची लांबी एक कि.मी. तर रुंदी आवश्यतेनुसार दोन ते ३.५ मीटर असेल. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे दोन कोटी रुपये खर्च करणार आहे.

* ऐतिहासिक वास्तू असलेल्या या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येथील मोकळ्या जागांचा वापर अनधिकृत पार्किंगसाठी केला जात आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यटनात भर टाकण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.