मुंबई : युनायटेड किंग्डमच्या महिला व समानता मंत्री, आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव एलिझाबेथ ट्रस यांनी मुंबई महापालिका मुख्यालयास मंगळवारी सायंकाळी भेट दिली. युनायटेड किंग्डमसोबतचे व्यापार, वाणिज्यिक संबंध आणखी दृढ करण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. तसेेच ऐतिहासिक पुरातन वारसा असलेल्या या इमारतीची पाहणी त्यांनी केली. ट्रस यांच्यासमवेत युनायटेड किंग्डमचे दक्षिण आशिया व्यापार आयुक्त तथा पश्चिम भारतासाठीचे ब्रिटिश उप उच्चायुक्त ॲलन गेमेल हेदेखील उपस्थित होते. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी ट्रस यांना या ऐतिहासिक इमारतीची माहिती देण्यात आली. तर मुख्यालया अंतर्गत असलेला सोनेरी घुमट तसेच महापालिका सभागृहाची शिष्टमंडळाने पाहणी केली. त्या वेळी पुरातन वारसा तज्ज्ञ भरत गोठोस्कर यांनी ऐतिहासिक माहिती दिली. तसेच इमारतीचे वैशिष्ट्य उलगडून दाखवले.या शिष्टमंडळाने महापौर व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा केली. मुंबईसह महाराष्ट्र राज्यासमवेत युनायटेड किंग्डमचे वाणिज्यिक व व्यापार विषयक संबंध अधिक दृढ करण्यासह नवीन संधी शोधून त्यास बळकटी देण्यावर द्विपक्षीय सहमती झाली. महापौरांनी स्नेहाचे प्रतीक म्हणून ट्रस यांना साडी भेट दिली. तसेच महापालिका बोधचिन्ह असलेले पदक व नागरी दैनंदिनी (डायरी) प्रदान करून शिष्टमंडळाचा सत्कार करण्यात आला.
यूकेच्या मंत्री एलिझाबेथ ट्रस यांचा पालिकेत हेरिटेज वॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 2:40 AM