Join us

पडद्यामागचा हिरो... मयूर शेळकेंचा जीव वाचवणारे लोको पायलट व्हिडिओत दिसलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 6:59 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण तुफान वेगात येणारी रेल्वे पाहिली, रेल्वे ट्रॅकवर पडलेला चिमुकला पाहिला, त्या चिमुकल्यास शोधणारी अंध माता दिसली, वाऱ्याच्या वेगाने रेल्वे ट्रॅकवर धावणारा मयूर शेळकेही दिसला.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण तुफान वेगात येणारी रेल्वे पाहिली, रेल्वे ट्रॅकवर पडलेला चिमुकला पाहिला, त्या चिमुकल्यास शोधणारी अंध माता दिसली, वाऱ्याच्या वेगाने रेल्वे ट्रॅकवर धावणारा मयूर शेळकेही दिसला.

मुंबई - वांगणी रेल्वे स्थानकावरील मोठी दुर्घटना होता होता वाचली. रेल्वे स्थानकावरील पॉईंटमन मयूर शेळके जिगरबाज शौर्य दाखवून 6 वर्षीय चिमुकल्याचा जीव वाचवला. सीसीटीव्ही व्हिडिओतून जगभर ही घटना व्हायरल झाली. त्यानंतर, मयूर शेळकेंवर कौतुकाचा वर्षाव झाला. पण, मयूरसोबतच आणखी एक व्यक्ती या कौतुकास पात्र आहे. ती व्यक्ती म्हणजे व्हिडिओत कुणालाही न दिसलेले लोको पायलट विनोद जांगीड. मात्र, पडद्यामागचा हा हिरो कुणाच्याच नजरेला पडला नाही. त्यामुळे, तो कौतुक आणि अभिनंदनापासून वंचित राहिला आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण तुफान वेगात येणारी रेल्वे पाहिली, रेल्वे ट्रॅकवर पडलेला चिमुकला पाहिला, त्या चिमुकल्यास शोधणारी अंध माता दिसली, वाऱ्याच्या वेगाने रेल्वे ट्रॅकवर धावणारा मयूर शेळकेही दिसला. पण, या व्हिडिओत न दिसणारी व्यक्ती म्हणजे लोको पायलट विनोद जांगीड. व्हिडिओत अदृश्य असलेल्या विनोद यांनी या कामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारण, त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळेच रेल्वे दोन जीव वाचले आहेत. 

विनोद जांगिड त्यादिवशी उद्यान एक्सप्रेसचे लोको पायलट होते. ताशी 105 किलोमीटर इतक्या वेगात ही गाडी घेऊन येताना, वळण पूर्ण झाल्यानंतर अचानक समोर ट्रॅकवर तो लहान मुलगा आणि त्याच्या समोर धावताना मयूर शेळके विनोद यांच्या नजरेस पडला. त्याचक्षणी समयसूचकता दाखवत विनोद यांनी सर्वप्रथम इमर्जन्सी ब्रेक दाबले. त्यामुळे 105 किलोमीटर प्रतितास एवढ्या प्रचंड वेगात असणारी एक्स्प्रेस अवघ्या तीन सेकंदात 80 ते 85 किलोमीटर प्रति तास या वेगावर येऊन पोहोचली. एक्सप्रेसचा वेग कमी झाल्यानेच मयूर शेळकेकडून ते सत्कार्य घडले अन् पडद्यामागच्या हिरोने दोन जीव वाचवले. त्यानंतर, ब्रेक दाबल्यामुले ती गाडी पुढे स्थानकात येऊन थांबली. विनोद यांना संपूर्ण प्रसंग समजला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.  

कारकिर्दीत असे अनेक अनुभव 

विनोद यांच्या कारकिर्दीत त्यांनी असे अनेक प्रसंग अनुभवले आहेत. मात्र, ते पडद्यामागचे हिरो असल्याने कधी शाबासकीची थाप किंवा कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर झालाच नाही. अनेक वेळा जनावरे रेल्वे ट्रॅकवर येतात, त्यांनी बाजूला व्हावे यासाठी लोको पायलट हॉर्न वाजवतात. मात्र, शेवटी त्या जनावराला धक्का लागतो अन् ते मरण पावते. या घटनांवेळीही गाडी चालवणारे कर्मचारी दुःखी होतात. जर चुकून एखाद्या व्यक्तीला ट्रेनचा धक्का लागून तो मृत झाला तर दो-तीन दिवस झोप येत नाही, असे विदारक अनुभव विनोद यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

आमदार गायकवाड यांनी घेतली भेट

एक अंध महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन वांगणी प्लॅटफॉर्म वरून जात असताना अचानकपणे तो लहानगा ट्रेक वर पडला. त्याचवेळी एक एक्स्प्रेस तिथून जात होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ड्युटीवर असलेल्या पॉईंटमन मयूर शेळके याने या मुलाचे अतिशय फिल्मी स्टाईल प्राण वाचवले. काही सकेंद कमी जास्त झाले असते तर अनर्थ घडला असता. मात्र अशाही परिस्थितीत मयूरने धाडस दाखवत त्याचे प्राण वाचवले. मयूरच्या या कामगिरी बद्दल स्वतः आमदारांनी त्याची भेट घेऊन त्याचं कौतुक केलं. तसेच, या भेटीदरम्यान आमदारांनी मयूरला एक धनादेश बक्षीस म्हणून सुपूर्द केला. अश्या माणसांचे कौतुक करावे तितकेच कमी अशी भावनाही आमदारांनी व्यक्त केली. 

टॅग्स :रेल्वेमुंबईअपघातव्हायरल फोटोज्