काय हो अंगणवाडीच्या ताई, तुम्हाला साड्या मिळाल्या का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 03:02 PM2023-05-18T15:02:55+5:302023-05-18T15:04:02+5:30
अंगणवाडी सेविका व मदतनीस गावातील माता व बालके यांच्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात.
मुंबई : अंगणवाडी सेविकांना ड्रेस कोडच्या दोन साड्या घेण्याकरिता हजार रुपये देण्यात आले. आतापर्यंत दरवर्षी ८०० रुपये देण्यात येत होते. यामध्ये यावर्षी २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस गावातील माता व बालके यांच्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात. गर्भवती महिलांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे यासोबतच आरोग्यापासून शिक्षणापर्यंतची महत्त्वपूर्ण भूमिका अंगणवाडी सेविका बजावतात.
मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. स्टेशनरीसाठीच्या पैशांत वाढ करून पाच हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी आहे.
साडीसाठी किती रुपये मिळाले?
n अंगणवाडी सेविकांना गणवेश खरेदीसाठी एका साडीला पाचशे रुपये याप्रमाणे दोन साड्यांसाठी एक हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.
n गुलाबी रंगाची साडी घेणे अनिवार्य केले आहे.
लवकरच राबविणार प्रक्रिया
अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून, ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
ही आहे अंगणवाड्यांची स्थिती
राज्यातील ९७ हजार अंगणवाड्या, तसेच १३ हजार मिनी अंगणवाड्यांमधून दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व अन्य कर्मचारी शून्य ते सहा वयोगटांतील जवळपास ७० लाखांहून अधिक बालकांना पोषण आहार देणे, माता आरोग्याची जपणूक या बालकांचे वजन-उंची, आदींची नोंद करणे, तसेच तीन ते सहा वयोगटांतील बालकांसाठी बालवाडी चालविण्याचे काम करीत असतात.