महेश चेमटे / मुंबईयंदाच्या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. युवा मतदारांचा सोशल मीडियावरील असलेला ओघ लक्षात घेता, उमेदवारांनीही आपला प्रचार हायटेक करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबूक, टिष्ट्वटर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार आपले मुद्दे मांडत आहेत. शिवाय पथनाट्य, नृत्य आणि डॉक्युमेंटरीचा प्रभावी वापर करून घेण्यात उमेदवारांची चढाओढ सुरू आहे.महापालिका निवडणुकीत युवा मतदारांच्या पसंतीस उतरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी कंबर कसली आहे. विविध पक्षांचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियासह स्थानिक समस्यांवर पथनाट्य, नृत्य सादर करणाऱ्या विविध महाविद्यालयीन मुलांना ‘हायर’ करताना दिसत आहेत. त्याचबरोबर मतदारांमध्ये ‘स्वप्रतिमा’ तयार करण्यासाठी विशेष डॉक्युमेंटरीदेखील बनवून घेत आहेत. विविध नागरी समस्यांनी मतदारांना ग्रासले आहे; शिवाय प्रचाराच्या पारंपरिक पद्धतीमुळे मतदारदेखील ‘देखल्या देवा दंडवत’ करतात. मात्र मतदारपेट्यांमध्ये कौल वेगळाच असतो. हे चित्र बदलण्यासाठी मतदारांचा कल लक्षात घेत प्रचारांमध्ये काळानुरूप बदल आवश्यक असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले.उमेदवारांसाठी पथनाट्ये, डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार काम करीत असल्याचे सांगितले. उमेदवारांची ‘आर्थिक रसद’ पाहून त्याच्या बजेट आराखड्यात त्याचा प्रचार करायचा अशी पद्धत सुरू आहे. पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करणारे, ग्राफिक्स, एडिटिंग अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. पथनाट्य आणि नृत्याच्या माध्यमातून अडचणी, समस्या आणि त्यावर उपाय सादर केले जातात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने परस्पर उमेदवारांवर चिखलफेक करण्याची पद्धत इतिहासजमा होऊ पाहत असल्याचे दिसून येत आहे.
प्रचाराला चढतोय ‘हायटेक’ रंग
By admin | Published: January 23, 2017 5:56 AM