गिरणगावचा हायटेक गणेशोत्सव
By admin | Published: September 4, 2016 02:23 AM2016-09-04T02:23:58+5:302016-09-04T02:23:58+5:30
गिरणगाव अशी ओळख असलेल्या लालबाग-परळमधला गणेशोत्सव वर्षागणिक ‘हायटेक’ होत चालला आहे. गिरण्या बंद पडल्यानंतर देशोधडीला लागलेला गिरणी कामगार, खोल्या
- प्रवीण दाभोळकर
गिरणगाव अशी ओळख असलेल्या लालबाग-परळमधला गणेशोत्सव वर्षागणिक ‘हायटेक’ होत चालला आहे. गिरण्या बंद पडल्यानंतर देशोधडीला लागलेला गिरणी कामगार, खोल्या विकून मुंबईबाहेर गेलेला इथला स्थानिक मराठी माणूस गणेशोत्सवात मात्र ‘लालबाग-परळ‘शी नाते सांगत इथे भक्तिभावाने हजेरी लावतो. लालबाग-परळ विभागात छोटी-मोठी अशी साधारण ५० ते ५५ गणेशोत्सव मंडळे आहेत. लालबागचा राजा, गणेशगल्ली, तेजूकाया, चिंचपोकळी, नरेपार्क, अभ्युदय नगर, रंगारी बदक चाळ असे सात मोठे गणेशोत्सव या ठिकाणी आहेत. वेस्टर्नचे एलफिन्स्टन-लोअर परेल, सेंट्रलचे परेल-करी रोड, हार्बरचे शिवडी-कॉटन ग्रीन अशा तीन मार्गांच्या रेल्वे जाळ्याच्या मध्यात हा विभाग येतो. भाविकांचा लालबाग-परळच्या दिशेने प्रवास सुरू होतो. यामध्ये तरुणाई फार मोठ्या संख्येने सहभागी होते. संपूर्ण गणेशोत्सव काळात लालबाग-परळच्या रस्त्यांना जत्रेचे स्वरूप आलेले असते. आपल्या गणेशोत्सवाचे वेगळेपण कसे जपता येईल यासाठी गणेशोत्सव मंडळासोबतच कार्यकर्त्यांची धडपडही पाहायला मिळते.
भव्य देखावा, उंच गणेशमूर्ती हीच आमच्या उत्सवाची ओळख आणि याचा आम्हाला अभिमान असल्याचे कार्यकर्ते, पदाधिकारी सांगतात. आम्ही कोणाशी स्पर्धा करत नाही तर आमच वेगळेपण जपत असतो, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एवढा मोठा खर्च रहिवाशांच्या वर्गणीतून करणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात जाहिराती गोळा केल्या जातात. मोठमोठे बॅनर्स, फ्लेक्स, स्मरणिका या माध्यमातून जाहिराती दिसत असतात.
तहान-भूक विसरून, ऊन-पाऊस झेलून भाविक तासन्तास रांगा लावतात. मंडळाच्या कार्यकर्त्यांना परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण नसल्याने अनेकदा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. यंत्रणेच्या तिपटीने भाविकांच्या संख्येत होणारी वाढ पोलिसांवरचा ताण अधिकच वाढवत असते. सेलीब्रिटी आल्यावर लोकांची अधिकच गर्दी होते. चोरांच्या सुळसुळाटापासून ते अतिरेकी कारवायांपर्यंत लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो. गणेशोत्सव मंडळांनीही भाविकांना ताटकळत न ठेवता खुले दर्शन देऊन जागा मोकळी केल्यास पोलिसांचा ताण कमी होऊ शकतो, हे पोलिसांच्या बोलण्यातून कळते.
कमी वर्गणीतला भव्य गणेशोत्सव अशी लालबाग-परळच्या उत्सवाची खासियत. टिळकांनी सामाजिक उद्देशाने सुरू केलेल्या गणेशोत्सवातला साधेपणा टिकविणे स्पर्धेच्या युगात उत्सव मंडळांना शक्य नसले तरी वर्षभरात सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्नही पाहायला मिळतो. पण गणेशोत्सव काळात गणपतीच्या मागेपुढे असणारीही मंडळी सामाजिक कार्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याची खंत जाणकार मंडळींकडून व्यक्त केली जाते. सर्वांचेच लक्ष इथल्या उत्सवाकडे असल्याने गणेशोत्सव मंडळाची आणि कार्यकर्त्यांची सामाजिक जबाबदारी वाढली आहे.
नवसाचा गणपती, गणेश मंडळांचे भव्य देखावे, उंच गणेशमूर्ती असा मध्यमवर्गीय वस्तीतला नयनरम्य उत्सव हे लालबाग-परळच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य. मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून आलेली सर्व जाती-धर्माची मंडळी रात्रंदिवस येत असतात, सेलीब्रिटींची रेलचेलही पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईसोबतच जगाचे लक्ष ‘लालबाग-परळ’च्या गणेशोत्सवावर असते.
1गेल्या तीन-चार वर्षांपासून गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यात लालबाग-परळमधल्या गणेशमूर्ती या आगमन सोहळ््यांचे विशेष आकर्षण बनल्या आहेत.
2देखाव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी काही दिवस आधीच गणेशमूर्ती मंडपात ठेवण्याची लगबग सुरू होते. लालबागचा राजा, गणेशगल्ली, तेजुकाया या गणेशमूर्ती जागेवरच बनतात, पण बाकीच्या गणेश मंडळांचे एकापेक्षा एक भव्य आगमन सोहळे यंदाही पाहायला मिळाले.
3सोशल मीडियावरची तरुणाई हातात
सेल्फी कॅमेरे घेऊन आगमन सोहळ्यात
मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. आगमन सोहळ्यामुळे गणेशोत्सवाच्या आधीपासूनच
या विभागात उत्सवाचे पडघम वाजू लागले
आहेत.