कोरोना प्रतिबंधक लसीबाबत आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यक्ती उत्सुक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या संक्रमणाला जवळपास आठ महिने उलटत असताना कोरोना प्रतिबंधक लसीबाबत समाधानकारक बाब समोर आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील संबंधितांनी ही लस टोचून घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. ‘लोकमत’ने या सर्व ठिकाणच्या व्यक्तींच्या घेतलेल्या प्रतिक्रियांत ९० टक्क्यांहून अधिक जणांनी आपण लस टोचून घेण्यास निसंकोचपणे तयार असल्याचे म्हटले आहे.
मुंबईतील बहुतांश वैद्यकीय तज्ज्ञांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी काही जणांनी लसीच्या उपयुक्ततेविषयी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे काही जणांनी लसीकरणासाठी आपण उत्सुक नसल्याचे म्हटले आहे. केंद्र शासनासह राज्य शासनाने सर्वांत आधी लसीची उपयुक्तता सर्व निकषांसह सिद्ध करावी, त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण हाती घ्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
लसीची ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, ॲम्ब्युलन्स कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. लसीबाबत उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देत जनतेच्या मनातील किंतु-परंतु दूर करण्याकरिता वैद्यकीय सेवेतील मंडळींनी आवर्जून ही लस घेणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अद्याप कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊनही कोरोनाची बाधा झालेली नाही, अशाच मंडळींना ती प्राधान्याने दिली जावी, अशी काही जणांची भूमिका आहे.
पालघर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ‘हाेय, आम्ही लस घेणार!’ अशी भूमिका स्पष्ट घेतली आहे. लस टोचल्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना असुरक्षितता वाटणार नाही, असे मत व्यक्त करीत नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामधील डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही कोरोनाची लस टोचून घेण्यास सकारात्मक भूमिका घेतली आहे. रायगड जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणा सज्ज असून लसीकरणासाठी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीही उत्सुक आहेत.