मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीमुंबईतील आपल्या भाषणात शिवसेनेवर जबरी टीका केली. शिवसेनेच्या 10 रुपयांच्या थाळीपासून ते जाहीरनाम्यापर्यंत राजगर्जना पाहायला मिळाली. राज यांनी हीच ती वेळ या शिवसेनेच्या जाहीरातीवरही सकडून टीका करत प्रश्न विचारला. आरेतील वृक्षतोडीवर शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेल्या वक्तव्यावरही राज यांनी समाचार घेतला.
राज यांनी प्रभादेवी येथील सभेत विविध विषयांवरुन सेना-भाजपा सरकारवर टीका केली. तसेच, देशातील वाढती बेरोजगारी आणि मंदीवरुन मोदी सरकारलाही लक्ष्य केले. सध्या आपला देश रशियाच्या वाटेवर चाललो आहोत असं वाटतंय; जिथे आख्खा देश फक्त 15 ते 20 उद्योपतींच्या हातात आहे. आणि म्हणूनच अनेक चांगले रशियन उद्योगपती देश सोडून गेलेत. तशीच परिस्थिती आज आपल्याकडे आहे, आपल्याकडचे उद्योगपती देश सोडून निघालेत, असे म्हणत वाढती बेरोजगारी आणि मंदीवरही राज यांनी भाष्य केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही राज यांनी सडकून टीका केली. शिवसेना-भाजपाने काढलेला जाहीरनामा जाळून टाकावा, असे राज म्हणाले. आरेतील वृक्षतोडीवर शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात जंगल घोषित करतो. 'आरे' केव्हा? आता काय गवत लावायचं का तिथ? असे राज यांनी म्हटले. तसेच, शिवसेनेच्या जाहिरातीवरही त्यांनी टीका केली. हीच ती वेळ म्हणे... मग 5 वर्षे काय केलं? असा सवाल राज यांनी विचारला.