- गौरी टेंबकर मुंबई - गाडीच्या काचा फोडून लॅपटॉप व कारटेप चोरी करणा-या सराईत शेरा चौहान (३९) याच्या मुसक्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी होत्या. त्याच्याकडून पोलीस मुद्देमाल हस्तगत करताना पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याने जीभ चावत स्वतःला जखमी करून घेतले. हा सगळा प्रकार तो मुद्देमालाची माहिती लपवण्यासाठी करत होता. मात्र तपास अधिकाऱ्यांनी त्याला योग्य प्रकारे हाताळत अखेर चोरीचा माल खरेदी करणारा त्याचा साथीदार सय्यद उर्फ शाहिद कल्लू खान (४२) चा गाशा गुंडाळला.
चौहान याला सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांनी पथकाच्या मदतीने नाशिकच्या एका हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सराईत अटक आरोपीने ३ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान पोलीस कोठडीत अन्नत्याग करणे, स्वतःचीच जीभ चावून रक्त काढून पोलीस पथकाचे रिकव्हरीवरुन लक्ष विचलित करणे असे प्रकार केले. मात्र पवार आणि त्यांच्या पथकाने अत्यंत सावधानीने प्रत्येक गुन्हयामध्ये त्याचा ताबा घेवून कौशल्यपूर्वक तपास करत चौहानचा चोर बाजारातील साथीदार खान याला अटक केली. त्याच्या चौकशीत पोलिसांनी दोन कार टेप आणि दोन लॅपटॉप मिळून जवळपास दीड ते दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जे.जे. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुरणे व पथकाच्या मदतीने ही कारवाई केली गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.