Join us  

मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 1:02 PM

शहरातील सर्व मंदिरांना सुरक्षेबाबत सतर्क केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संशयास्पद हालचालीबाबत पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना केले आहे

मुंबई - केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या धोक्याच्या सूचनेनंतर मुंबईत हायअलर्ट जारी केला आहे. शहरात आगामी सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी माहिती गुप्तचर यंत्रणाकडून मिळाली आहे. त्यातूनच मुंबईत पोलिसांनी हायअलर्ट जारी केला आहे. धार्मिक स्थळांसह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी बाळगली आहे. पोलिसांना मॉक ड्रील करण्याच्या सूचना आहेत. गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रिल तयारी करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत. सर्व डिसीपींना त्यांच्या संबंधित झोनमधील सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. नुकतेच क्रॉफर्ड मार्केट परिसरात एक मॉक ड्रिय आयोजित करण्यात आला होता. हा परिसर प्रचंड गर्दीचा ओळखला जातो, त्याठिकाणी २ प्रमुख धार्मिक स्थळही आहे असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील इतर ठिकाणीही मॉक ड्रिल करून सुरक्षेची तयारी तपासली जात आहे. शहरातील सर्व मंदिरांना सुरक्षेबाबत सतर्क केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संशयास्पद हालचालीबाबत पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना केले आहे. गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. याठिकाणी पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे.

पुढील काही दिवसांवर नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. त्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात गरबा आयोजित केला जातो, हजारोंच्या संख्येने लोक जमतात. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. नवरात्री, दिवाळी यासारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईवर याआधी झालेले दहशतवादी हल्ले पाहता पोलिसांनी गुप्तचर यंत्रणाकडून मिळालेल्या माहितीनंतर खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसदहशतवादी हल्ला