मुंबई : काश्मीरमधील घडामोडींनंतर मुंबईसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणा (आय.बी.)ने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बकरी ईद, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी व आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता मुंबई पोलिसांसह सर्व तपास यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सशस्त्र पोलीस दलातील प्रत्येक जवानाने ताब्यातील शस्त्र, दारूगोळा, लाठी, हेल्मेटसहित सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. कर्तव्यावर असताना मोबाइलवर गुंतून राहू नका, कायम सतर्क राहा, असेही निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. सशस्त्र दलाच्या नायगाव येथील मुख्यालयात रात्रपाळीला एक अधिकारी, १०० अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी राखीव ठेवावी, अशाही त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.त्याशिवाय, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शिघ्रकृती दल, फोर्स वन यांच्याकडून शहरात जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी संशयित व्यक्ती, वस्तू, सामान, वाहने यांची कसून तपासणी सुरू केली आहे. मुंबईत वाढविलेल्या बंदोबस्तामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंत्रालयासह शासकीय मुख्यालये, नेत्यांची निवासस्थाने, अन्य महत्त्वाची शासकीय ठिकाणे, तसेच गजबजलेल्या बाजारपेठा, धार्मिक स्थळे, मॉल्स, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त आणि गस्त वाढविली आहे.स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर तपासणीमुंबई : रेल्वे स्थानकांवर १५ आॅगस्ट आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या वतीने पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, दादर आणि मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर, भांडुप स्थानकावर तपासणी सुरू केली आहे.उपनगरी रेल्वे स्थानकांवर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याचा इशारा दिल्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. दहशतवाद्यांकडून घातपात करण्याचा कट रचला जाण्याच्या शक्यता असल्याने सर्व रेल्वे स्थानकांना ‘अलर्ट’ केले आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास मुंबई सेंट्रल स्थानकावर आणि सायंकाळी सहाच्या सुमारास दादर स्थानकावर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे, रेल्वे सुरक्षा बल, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड, श्वान पथक यांच्याद्वारे तपासणी केली. अडगळीची जागा, फलाटे, गर्दीची ठिकाणे, पादचारी पूल, कचराकुंडी तपासण्यात आल्या. या वेळी एकूण ८ अधिकारी व ७५ कर्मचारी व ५ श्वान पथके सहभागी होती.कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील घाटकोपर स्थानकाची नुकतीच तपासणी करण्यात आली, तर भांडुप स्थानकावर शुक्रवारी जनजागृती कार्यक्रम पार पडला. कुर्ला रेल्वे पोलीस हद्दीत होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी व याबाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबविला. या वेळी सुमारे १५० ते २०० जण हजर होते. धावत्या लोकलवर होणाºया दगडफेकीच्या घटनांबाबत माहिती दिली. लोकलवर कोणी दगड मारणारा व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.ए. इनामदार यांच्या वतीने केले आहे.रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवलीसुरक्षा विभागाकडून रेल्वे स्थानकांवर गस्त वाढविण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणाची तपासणी केली जात आहे. यासह प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर किंवा लोकलमध्ये संशयित प्रवासी, संशयित वस्तू दिसल्यास सुरक्षा विभागाला कळविण्याचे आवाहन मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी केले आहे.
मुंबईमध्ये हाय अलर्ट; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 7:02 AM