मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. तसेच, गुप्तचर यंत्रणांनी देशात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हायअलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
गेल्या 22 फेब्रुवारीला मुंबई येथील चर्चगेटमधील महानिरीक्षक कार्यालयाने मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर येथील आरपीएफ प्रमुखांना पत्र पाठवले आहे. तसेच, आरपीएफ महानिरीक्षक कार्यालयाने पश्चिम स्थानकांवरील सर्व सुरक्षा यंत्रणांना लांब पल्ल्यांच्या गाड्यावर करडी नजर ठेवण्याचा आदेश दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, खासकरुन, जम्मू-काश्मीरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे गाड्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गुजरातमधील गुप्तचर यंत्रणांनी सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले जातील अशी माहिती दिली आहे. यामध्ये रेल्वे स्थानके, मंदिर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला लक्ष केले जाऊ शकते, असे वर्तविण्यात आले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते.