मुंबईच्या विमानतळावर ३१ आॅगस्टपर्यंत हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 06:44 AM2019-08-16T06:44:21+5:302019-08-16T06:44:43+5:30
स्वातंत्र्य दिनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदीसह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुंबई : स्वातंत्र्य दिनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदीसह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईसह देशातील १५ मोठ्या शहरांवर अतिरेक्यांचे सावट असल्याने गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवानांसह केंद्रीय राज्य राखीव दल, राज्य दहशतवादविरोधी दल, शिघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकांच्या मदतीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात होता.
लवकर पोहोचण्याचे आवाहन
विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी अनेक ठिकाणी
चौकशी व तपासणी होणार असल्याने प्रवाशांनी विमान
चुकू नये यासाठी लवकर विमानतळावर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एअरपोर्ट एन्ट्री पासवर यापूर्वीच निर्बंध
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही कडेकोट बंदोबस्त होता. ब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी (बीसीएएस) ने ३१ आॅगस्टपर्यंत मुंबई विमानतळाला हाय अलर्ट जारी केला आहे.
विमानतळ सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांसोबत समन्वय ठेवून विमानतळ परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश सीआयएसएफला देण्यात आले होते. देशातील प्रमुख १९ विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था पूर्वीपेक्षा कडक केली आहे. ३१ आॅगस्टपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे. एअरपोर्ट एन्ट्री पासवर यापूर्वीच निर्बंध लादण्यात आले आहेत.