- स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रक्तदाबाचा विकार (ब्लेडप्रेशर) आता पन्नाशीनंतरच्या व्यक्तींपुरता सीमित राहिलेला नाही. तसेच त्याने शहरी भागातून ग्रामीण भागात प्रवेश केलेला आहे. आता विशीतील तरुणांमध्येही उच्च रक्तदाबाची लक्षणे सहज आढळून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कामाचे वाढलेले तास, व्यसनाधीनता, मानसिक ताण-तणाव यांसारख्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणपिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असल्याचे जागतिक रक्तदाब दिनानिमित्त (वर्ल्ड हायपरटेन्शन डे) घेतलेल्या आढाव्यातून ही माहिती समोर आली आहे. आरोग्य विमा कंपनीने मुंबईत याविषयी केलेल्या अभ्यासात, २५ ते २७ वयोगटातील २७ टक्के पुरुष व २४ टक्के महिलांना पूर्व उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, असे आढळून आले आहे. जर या त्रासावर योग्य वेळी उपचार केले नाहीत, तर कायमस्वरूपी उच्च रक्तदाब किंवा पक्षाघात आणि कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसीज (सीव्हीडी) होण्याची शक्यता असते. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या कालावधीत २१ हजार ६२३ व्यक्तींनी केलेल्या आरोग्य तपासणीद्वारे हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. शहरी भागातील व्यक्तींमध्ये उशिरा जेवणे, स्मार्टफोन्सवर अति वेळ घालविणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढते. इतकेच नव्हे, तर जीवनशैलीतील अनियमिततेमुळे १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो.उच्च रक्तदाबाची समस्या रुग्णांमध्ये वाढत चालली असून, यात ३५ ते ४० टक्के रुग्ण हे शहरी भागातील आहेत, तर १८ ते २० टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. २५ ते ३५ वयोगटातील ३२ टक्के तरुण पिढीला बेशिस्त जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. मुंबईलगतच्या ग्रामीण भागातील १८ % पुरुष व % महिलांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव व अन्नातील कीटकनाशकांमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसून आले आहे. मात्र, शहरी भागांपेक्षा ही आकडेवारी तुलनेने कमी आहे. ४० ते ५० वर्षे जास्तीत जास्त पुरुषांमध्ये ‘मधुमेह’ या आजारामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढलेला दिसून येतो. उच्च रक्तदाबाशी थेट संबंध असलेला मधुमेह २८ टक्के पुरुषांमध्ये असल्याचे दिसून येते. असा मोजला जातो रक्तदाब रक्तवाहिन्या आकुंचित झालेल्या असतानाचा दाब (सिस्टॉलिक) आणि प्रसरण पावलेल्या असतानाच दाब (डायस्टॉलिक) मोजला जातो. सामान्यत: सिस्टॉलिक प्रेशर १२०, तर डायस्टॉलिक प्रेशर ८० मि.मी. (१२०/८०) असणे अपेक्षित असते. हा रक्तदाब १४०/९० वर गेला की, उच्च रक्तदाबाची पूर्वपायरी समजले जाते.मे महिन्यात २५ लाख जणांच्या तपासणीचे लक्ष्यइंडियन काउन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने स्थानिक आरोग्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उच्च रक्तदाब तपासणीसाठी नवे अभियान हाती घेतले आहे. ‘मे महिना मेजरमेंट मंथ’अंतर्गत २५ लाख व्यक्तींची उच्च रक्तदाब तपासणी करण्याचे लक्ष्य आहे. द पब्लिक हेल्थ फाउंडेशन आफ इंडियाच्या सहकार्याने हे अभियान करण्यात येत असून, त्यांतर्गत देशभरातील विविध डॉक्टरांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे संस्थेच्या डॉ. मीनाक्षी शर्मा यांनी सांगितले.उच्च रक्तदाबाच्या लहान-मोठ्या लक्षणांपासून ९० टक्के लोक अनभिज्ञ असतात. बऱ्याचदा समुपदेशन सत्रांमध्ये अनेकदा तरुणांच्या उच्च रक्तदाबामागे कामाचा ताण, नोकऱ्यांचे अस्थैर्य, असमाधान ही कारणे आढळतात. व्यावसायिक ताण तरुण-तरुणींच्या तब्येतीवर ताबा मिळवत असल्याने, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरही परिणाम होताना दिसतो आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मुख्य म्हणजे नियमित व्यायाम करावा. अर्थात रक्तदाबाची समस्या वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या; परंतु रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्यासाठी समतोल आहार, योगासने, व्यायाम आणि औषध यांची निश्चितच मदत होईल.-डॉ. अमोल पवार, फिजिशियन