गर्भपात करण्यास हायकोर्टाची परवानगी, अल्पवयीन बलात्कार पीडितेला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:23 AM2018-07-14T06:23:44+5:302018-07-14T06:23:56+5:30
२१ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी देत, उच्च न्यायालयाने शुक्रवारी तिला मोठा दिलासा दिला आहे. बलात्कारामुळे पीडितेला गर्भधारणा झाल्याने तिच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली.
मुंबई : २१ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी देत, उच्च न्यायालयाने शुक्रवारी तिला मोठा दिलासा दिला आहे. बलात्कारामुळे पीडितेला गर्भधारणा झाल्याने तिच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी गुरुवारच्या सुनावणीत केईएम रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाला मुलीची चाचणी करून, तिचा गर्भपात करणे योग्य आहे का, या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारच्या सुनावणीत केईएमच्या डॉक्टरांनी न्यायालयात अहवाल सादर केला. गर्भपात केल्यास तिच्या जिवाला धोका नसल्याचे सांगितले. न्यायालयाने पूर्ण अहवाल वाचून मुलीला गर्भपातास परवानगी दिली.
मुलीवर बलात्कार झाल्यानंतर काही दिवसांनी तिच्या पोटात दुखू लागले, म्हणून तिच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेले. तपासणीत पीडिता गर्भवती असल्याचे समजले. मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिच्या आईने तिला सायन रुग्णालयात नेले. मात्र, सायन रुग्णालयाने मुलगी २० आठवड्यांची गर्भवती असल्याने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर, तिने राजावाडी रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी तिच्या आईला न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे तिच्या आईने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने मुलीला गर्भपात करण्यास परवानगी दिली.