ईडीला हायकोर्टानेही धरले धारेवर; लगेच अपेक्षा कशी करता?, राऊतांच्या जामिनाला तत्काळ स्थगितीची मागणी फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 06:04 AM2022-11-10T06:04:40+5:302022-11-10T06:05:30+5:30
पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी जामिनावर सुटका केली.
मुंबई :
संजय राऊत यांना जामीन देण्याबाबत विशेष न्यायालयाचा आदेशही मी वाचला नाही. कशाच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे, हे सुद्धा मला माहीत नाही. कशाच्या आधारावर तुम्ही (ईडी) या आदेशाला आव्हान देत आहात, तेही माहीत नाही. अशा स्थितीत प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय मी जामिनाला स्थगितीचा आदेश कसा देऊ? अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. भारती डांग्रे यांनी जामिनाला तत्काळ स्थगितीची ईडीची मागणी फेटाळली. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी जामिनावर सुटका केली. या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी होती. पण दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय मी आदेश देऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी त्वरित स्थगिती देण्यास नकार दिला.
केंद्रीय तपास यंत्रणेच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेऊ. या सुनावणीनंतर जर जामीन रद्द केला, तर आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले जाऊ शकते,’ असेही न्या. डांग्रे म्हणाल्या.
पीएमएलए न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे
- विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या बदलत्या भूमिकेचीही नोंद यावेळी घेतली. सुरुवातीला ईडीने याप्रकरणी राकेश, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे मुख्य आरोपी असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांना या प्रकरणात मुख्य आरोपी केले, यावर निकालपत्रात बोट ठेवले आहे.
- म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद आहे. २००६-२०१३मध्ये घडलेल्या घटनेबाबत त्यांनी २०१८मध्ये तक्रार केली. मात्र, अद्याप ईडीने त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आरोपी केले नाही.
- वाधवान यांनी स्पष्टपणे त्यांचा गुन्हा कबूल केला. तरीही त्यांना मोकळे सोडण्यात आले. यावरून ईडीची असमान वागणूक व काही लोकांना निवडून त्यांच्यावर कारवाई करण्याची वृत्ती दिसून येते. दोन्ही आरोपींचा जामीन मंजूर न करण्याची ईडी व म्हाडाची मागणी मान्य केली, तर न्यायालयाने त्यांच्या या वृत्तीवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होईल.
एकलपीठ काय म्हणाले?
विशेष न्यायालयाने महिनाभर जामीन अर्जावर सुनावणी घेतली आणि त्यानंतर निकाल दिला. त्याला दिलेल्या आव्हानावर मी तत्काळ निर्णय घेऊ, अशी अपेक्षा कशी करू शकता? तुमच्यावर (ईडी) किंवा त्यांच्यावर (राऊत बंधू) कोणताही अन्याय होऊ नये. जेव्हा तुम्ही जामीन रद्द करण्यासाठी येता, तेव्हा न्यायालयाला मर्यादित अधिकार असतात, असे न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.
सुटका झाली याचा आनंद आहे. आजच्या निर्णयाने न्यायालयावरचा विश्वास वाढला आहे. मी जे आधी म्हणत होतो तेच न्यायालयाने आज म्हटले. आम्ही अंगार आहोत. शंभर दिवस जेलमध्ये होतो, त्यामुळे माझी तब्येत जरा बरी नाही. पण, सर्व शिवसैनिकांना पाहून ऊर्जा आली.
- खा. संजय राऊत
... आणि राऊतांनी जोडले हात
मुंबई : विशेष न्यायालयाचे न्या. एम.जी. देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन मंजूर केल्याचे जाहीर केल्यावर सुरुवातीला संजय राऊत यांना काय झाले, हे समजलेच नाही. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन मंजूर झाल्याचे सांगितले. त्यावेळी काहीसे भावुक झालेल्या आणि भारावलेल्या राऊत यांनी न्या. देशपांडे यांच्यासमोर हात जोडत, ‘मी आपला आभारी आहे,’ असे म्हटले. त्यावर ‘त्यात आभार मानण्यासारखे काही नाही. आम्ही आमचा निर्णय गुणवत्तेच्या आधारावर देतो. जेव्हा गुणवत्ता नसते, तेव्हा आम्ही आमचा निर्णय देत नाही,’ असे न्या. देशपांडे म्हणाले. दरम्यान, न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा निकाल येताच न्यायालयात टाळ्यांचा कडकडाट झाला. न्यायालयात कधीही न दिसलेले दृश्य यावेळी दिसले.
ईडीचे म्हणणे...
ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. या घोटाळ्यात ते संजय राऊत यांचा ‘मोहरा’ आहेत. संजय राऊत हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. संजय राऊत यांच्यासाठी प्रवीण राऊत काम करत होते. प्रवीण राऊत यांनी बेकायदा म्हाडाचा भूखंड अन्य विकासकांना विकला आणि पैसे कमावले. त्यांनी ११२ कोटींचा गैरव्यवहार घोटाळा केला. त्यापैकी काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ही रक्कम कोणी दिली व कोठून आली, याचे उत्तर वर्षा राऊत देऊ शकल्या नाहीत.