मुंबई: मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’चा वाद आता थेट उच्च न्यायालयात पोहचला आहे. ‘अँटिलिया’ उभे असलेला भूखंड राज्याच्या वक्फ बोर्डाकडून बाजारभावापेक्षा अगदी किरकोळ किंंमतीला घेण्यात आला असून या भूखंडावर असलेल्या अनाथ मुलांना रस्त्यावर आणण्यात आले. या व्यवहाराची सीबीआय चौकशी व्हावी. तसेच अँटिलिया खाली करण्याचे आदेश दे२ऊन एफआयआर नोंदवण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने अंबानींसह राज्य सरकार, धर्मदाय आयुक्त व अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. अँटिलिया उभारण्यासाठी अनाथआश्रमाचा भूखंड लाटण्याचा आल्याचा आरोप शदाब पटेल यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. अँटिलियाच्या भूखंडाबाबत शेख समितीने सादर केलेल्या अहवालानंतर अँटिलियाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले. त्यानंतर आता पुन्हा हे प्रकरण उकरून काढण्यात आले आहे. पटेल यांनी केलेल्या याचिकेनुसार, मलबार हिले येथे १९९६ मध्ये करीमभाय इब्राहिमभाय कोहजा अनाथआश्रम सुरू करण्यात आले. ख्वाजा समाजाच्या अनाथ मुलांना येथे आश्रय देण्यात येत असे. मात्र मलबार हिल येथील भूखंडांचे वाढते भाव आणि मोकळ्या भूखंडांची कमतरता यामुळे हे अनाथआश्रम येथून हटवण्यात आले. येथील अनाथ मुलांना रस्त्यावर आणून हा भूखंड अँटिलियासाठी देण्यात आला. वक्फ बोर्डाने २०० कोटींचा भूखंड अवघ्या २१ कोटी रुपयांना अँटिलियासाठी दिला.या व्यवहाराची चौकशी सीबीआयला करण्याचे निर्देश द्यावे किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे. तसेच या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्यावे. २०१२ मध्ये वक्फ बोर्ड आणि अंबानी यांच्यात झालेला विक्री करार रद्द करावा व पुन्हा ही जागा अनाथआश्रमाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी पटेल यांनी याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
अँटिलिया वाद उच्च न्यायालात
By admin | Published: May 04, 2016 3:20 AM