Join us

प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:07 AM

२८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनी लॉन्ड्रिंगसह अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) ...

२८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मनी लॉन्ड्रिंगसह अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्यांची दोन मुले व निकटवर्तीय यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना २८ जुलैपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत.

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल) आणि टिटवाळा येथील एक जमीन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रताप सरनाईक, त्यांची मुले विहंग व पूर्वेश तसेच त्यांचे निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. ईडीच्या या कारवाईला सरनाईक, त्यांची मुले आणि चंडेला यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.

ईडीने बजावलेली समन्स रद्द करण्याची मागणी या चौघांनीही केली आहे. सरनाईक यांना आणखी एका प्रकरणात अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणांची आणि जुन्या प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेऊ, असे म्हणत न्यायालयाने या चौघांनाही २८ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.