Join us

मुलीचे चारित्र्यहनन करू पाहणाऱ्या वकिलाला उच्च न्यायालयाने दरडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार करणाऱ्या महिलेच्या वकिलांवर उच्च न्यायालय चांगलेच वैतागले. संबंधित वकिलाने मुलीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुलीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार करणाऱ्या महिलेच्या वकिलांवर उच्च न्यायालय चांगलेच वैतागले. संबंधित वकिलाने मुलीचे अनेक प्रियकर असल्याचे म्हणत तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याने न्यायालयाने वकिलालाच चांगले फैलावर घेतले.

आपल्याविरुद्ध व वडिलांविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत आईने पोलिसांत दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर होती.

मुलीला पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जायचे आहे म्हणून ती गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात आली आहे. तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य नाही, असा युक्तिवाद मुलीच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यावर तक्रारदार महिलेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मुलीचे अनेक प्रियकर आहेत, असे तक्रारदार आईच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

त्यावर संतापत न्या. पितळे यांनी हा युक्तिवाद इथेच थांबवा, असे वकिलांना आदेश दिले. ‘हा काय युक्तिवाद आहे? हे तिचं (याचिकाकर्ती) आयुष्य आहे. तिचे अनेक प्रियकर आहेत, हा काय युक्तिवाद झाला का? कायदेशीर मुद्द्यांवर युक्तिवाद करा,’ असे न्यायालयाने दरडावले.

‘जिच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत, ती मुलगी दूर चालली आहे, हे ऐकून तक्रारदार आईने आनंदी व्हायला पाहिजे,’ असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवर १९ एप्रिल रोजी निकाल देऊ, असे स्पष्ट केले.