Bhim Army : चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 12:57 IST2018-12-31T11:40:47+5:302018-12-31T12:57:16+5:30
Bhim Army : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली आहे

Bhim Army : चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली
मुंबई/पुणे - भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली आहे. 30 डिसेंबरला पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेमध्ये चंद्रशेखर आझाद उर्फ रावण संबोधित करणार होते. तर 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'संवाद आंबेडकरी तरुणाईशी' या कार्यक्रमात आझाद विद्यार्थ्यांशी साधणार संवाद होते. यापैकी एसएसपीएमएस ग्राऊंडवर होणाऱ्या सभेला पुणे प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. याप्रकरणी भीम आर्मीनं न्यायालयाकडे दाद मागितली. यावर सोमवारी (31 डिसेंबर)झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाकडूनही चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.
जर भीम आर्मीच्या बाजूनं निकाल लागला असता तर आज एसएसपीएमएस ग्राऊंडवर आझाद यांनी सभा घेतली असती.
(कितीही ताकद लावा कोरेगाव-भीमाला जाणारच: चंद्रशेखर आझाद)
दरम्यान, प्रशासनानं कितीही जोर लावला तरीही आम्ही कोरेगाव-भीमाला जाणारच. परवानगी मिळाली नाही तर कार्यकर्त्यांसह पायी चालत जाणार. हे सरकार आंबेडकरी जनता आणि कार्यकर्त्यांचा आवाज दाबत असून आम्हाला नजरकैदेत ठेवले जात आहे, असा आरोप चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.
No relief yet for Bhim Army Chief Chandrashekhar alias Ravan for his rally in Pune today. High Court has asked Pune Police to file a reply/report by the next date of hearing that is 4th January 2019. (file pic) pic.twitter.com/n9zXCrzHOj
— ANI (@ANI) December 31, 2018
(आझाद यांना भीमा-कोरेगावला जाऊ न देणं म्हणजे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली- कपिल पाटील)
पुणे : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली. #BhimArmy अधिक माहितीसाठी https://t.co/thzM8y3GOE
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 31, 2018
आझाद हे रविवारी (30 डिसेंबर)रात्री 9.30वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाले. यावेळेस त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. यावेळेस ते म्हणाले की, हे सरकार अघोषित आणीबाणी लादत असून मला तीन दिवस नजरकैेदेत ठेवण्यात आले. भाजपाचे सरकार हुकूमशाही करत आहे. आंबेडकरवादी जनता संविधानाला मानते. आम्ही शांततेच्या मार्गानं परवानगी मागत आहोत. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना मोकळे सोडण्यात आले. आम्ही पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली. मात्र आम्हाला परवानगी नाकारण्यात आली
नजरकैदेतून सुटका
दरम्यान, आझाद यांची पोलिसांच्या नजरकैदेतून रविवारी (30 डिसेंबर) सुटका करण्यात आली. तेथून ते कोरेगाव भीमाच्या दिशेनं रवाना झाले होते. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येते जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले होते. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे मुंबईतील जांबोरी मैदानावरील आझाद यांची शनिवारची सभादेखील रद्द झाली होती.
कोण आहे चंद्रशेखर आझाद?
तीन वर्षांपूर्वी अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी भीम आर्मीची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कामे केली आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील जातीय हिंसाचाराच्या घटनेमुळे तेथील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली. सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून दीड महिनाभरापूर्वी सहारनपुर कारागृहातून मुक्तता झाली. मात्र आझाद हे कारागृहात असतानाच आता देशातील दलित बहुजनांचा आक्रमक नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील तरुण या संघटनेकडे आकृष्ट झाला आणि भीम आर्मी मागील दीड वर्षात देशभरात वाढली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भाजपाला सत्तेतून बाहेर करण्याची घोषणा आझाद यांनी केली होती.
1 जानेवारी 1818 मधील लढा
इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने मोठी कामगिरी बजावली होती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला हाेता. यंदा या लढाईला 201 वर्षे पूर्ण हाेणार आहेत. भीमा कोरेगाव येथे या लढाईत हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी लाखो आंबेडकरी जनता या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असते. 2018 वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.