मुंबई - निर्माते उदय धुरत यांचे मूळ 'मी नथुराम गोडसे बोलतोय' आणि शरद पोंक्षे यांच्या 'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकांमध्ये सुरू असलेल्या वादावर हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निर्देश दिला आहे. यानुसार पोंक्षे यांची भूमिका असलेल्या 'नथुराम गोडसे' या नाटकाच्या शीर्षकात नवीन काही न जोडण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाच्या नावात 'नथुराम गोडसे बोलतोय' ऐवजी 'नथुराम गोडसे' असा बदल केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली होती. त्यावर 'नथुराम गोडसे' या नवीन शीर्षकात यापुढे नवीन काही जोडू नका, असे निर्देश न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी पोंक्षेंना दिले आहेत. या प्रकरणी ३० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या नव्या नाटकातील संहिता, सादरीकरण व ट्रेडमार्कचे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या मूळ नाटकाशी साधर्म्य असल्याने व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत माऊली प्रॉडक्शन्सचे मालक व निर्माते उदय धुरत यांनी माऊली भगवती प्रॉडक्शन्सचे मालक प्रमोद धुरत व शरद पोंक्षे यांच्या विरूद्ध दावा दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या पुढे सुनावणी झाली. मागील सुनावणी वेळी नव्या नाटकाच्या नावात बदल करण्याची तयारी पोंक्षे यांनी दर्शवली होती. त्यासाठी सेन्सॉर मंडळाची परवानगी मिळवून 'नथुराम गोडसे बोलतोय' या शीर्षकाऐवजी 'नथुराम गोडसे' असा बदल केल्याचे पोंक्षेंच्या वकिलांनी न्यायालयाला कळवले. या बदलाला आक्षेप नसल्याचे निर्माते उदय धुरत यांच्यातर्फे अॅड. हिरेन कमोद व अॅड. महेश म्हाडगुत यांनी सांगितले.
विनय आपटे यांचे बंधू विवेक आपटे यांच्या पुर्नदिग्दर्शनाखाली 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे मूळ नाटक लवकरच पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. या नाटकात सौरभ गोखले नथुरामची भूमिका साकारणार आहे. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यातून सौरभची नथुराम साकारण्यासाठी निवड करण्यात आली. सध्या या नाटकाच्या तालमी मुंबईत सुरु असून लवकरच हे ओरिजनल नाटक रसिकांना पहायला मिळणार आहे असे निर्माते उदय धुरत म्हणाले.