Join us  

कोस्टल रोडसाठी टाटा गार्डनमधील झाडांची कत्तल न करण्याचे उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:06 AM

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पासाठी दक्षिण मुंबईतील टाटा गार्डनमधील वृक्षांची २१ मे पर्यंत कत्तल करू नका, असे निर्देश ...

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पासाठी दक्षिण मुंबईतील टाटा गार्डनमधील वृक्षांची २१ मे पर्यंत कत्तल करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिले.

सोसायटी फॉर improvement ग्रीनरी अँड नेचर या एनजीओने टाटा गार्डनमधील वृक्ष कोस्टल रोडसाठी तोडण्यात येत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. एस.जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने ६ जानेवारी रोजी या गार्डनमधील वृक्ष तोडण्याची परवानगी दिल्याचे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ६९ वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे, तर ७९ वृक्षांचे ट्रान्सप्लांटेशन करण्यात येणार आहे. वृक्षांची कत्तल करण्याचे काम सुरू झाले आहे आणि काही वृक्ष तोडण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.

त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देत पालिकेला २१ मेपर्यंत टाटा गार्डनमधील वृक्ष न कापण्याचे अंतरिम निर्देश दिले.